गृहमंत्रीपदासह १३ मंत्रिपदे द्या, तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार!
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली जोरात सुरू असतानाच गुरुवारी रात्री राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु महायुतीचे नेते राज्यात परतताच नाराजीनाट्य सुरू झाल्याचे समोर आले आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या गावी निघून गेले. ते गृह मंत्रिपदासाठी अडून बसले असल्याचे समजते. परंतु भाजप गृहमंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यावरून घोडे अडल्याचे समजते. त्यामुळे महायुतीची आजची बैठकही रद्द झाली. दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु अधिकृत घोषणा झाली नसल्याने संभ्रम वाढला आहे. त्यातच आता ५ डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी भाजप पक्षश्रेष्ठींसमोर एक अट घातली असल्याचे समजते. शिंदे हे गृहमंत्रीपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळाले तरच आपण उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अतिशय महत्वाच्या गृहखात्यासह आणखी १३ खात्यांची शिंदेंनी अमित शहांसमोर मागणी केली असल्याचे समजते. दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील दरे गावी पोहोचले आहेत. शिंदे दोन दिवस तेथे मुक्कामी राहणार असून दोन दिवस महायुतीच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. तरीही मंत्रिपदाच्या वाटाघाटीमुळे राजकीय वातावरण गरम असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे राज्य कारभारातील सर्वात महत्वाचे खाते असलेल्या गृहखात्यावर अडून बसले आहेत तर नगरविकास खात्यासह अन्य १२ खात्यांवर त्यांनी आपला दावा मजबूत केला आहे. पण मागच्या सरकारमध्ये भाजपकडे गृहखाते राहिले असल्याने त्यांचाही प्रबळ दावा आहे. त्यामुळे तिढा वाढत चालल्याचे बोलले जात आहे.
महायुतीची महाबैठक रद्द
राजधानी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली. आता पुढील बैठका या राज्यात होणार होत्या. त्यानुसार शुक्रवारी महायुतीच्या नेत्यांची महाबैठक आयोजित केली होती. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार होती. परंतु ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या गावी निघून गेल्याने आजच्या प्रस्तावित बैठका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, त्यांनी मीडियाशी बोलण्यासही नकार दिला. त्यामुळे शिंदे यांच्या मनात काय चालले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंत्र्यांची संख्या, खातेवाटप,
पालकमंत्रीपदावरूनही वाद
महायुतीचे सरकार स्थापन करताना मंत्र्यांची संख्या, खातेवाटप आणि पालकमंत्रिपद हे कळीचे मुद्दे ठरत आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला असला तरी ५७ आमदार निवडून आल्याने त्यांना अधिकची व चांगली मंत्रिपदे हवी आहेत. नगरविकास खाते शिंदे यांच्याकडे कायम राहील, अशी चिन्हे आहेत. याखेरीज त्यांनी ऊर्जा, जलसंपदा, उद्योग या महत्त्वाच्या खात्यांवर दावा केला आहे. अजित पवार यांच्याकडे वित्त खाते कायम राहणार का, याची उत्सुकता आहे. कारण भाजप गृह आणि वित्त या खात्यांसाठी आग्रही आहे. यासह सहकार, कृषी, महिला व बालकल्याण, अन्न व नागरी पुरवठा अशी खाती मिळावीत, असा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. मात्र मित्र पक्षांना भाजप फारसे झुकते माप देण्याची शक्यता नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.