30.6 C
Latur
Saturday, May 3, 2025
Homeमहाराष्ट्रशिंदे-ठाकरे येणार एकाच मंचावर?

शिंदे-ठाकरे येणार एकाच मंचावर?

राष्ट्रवादी काँग्रेस करणार माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार 

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून आज, शनिवारी (ता. ३ मे) महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या निमित्ताने अनेक राजकीय नेते एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. पण या सर्वातही चर्चा सुरू झाली आहे ती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर येण्याची.

दरम्यान, राज्यात गेल्या तीन वर्षांत अनेक राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. पण त्यातही सर्वांत दोन मोठ्या घडल्या आहेत, त्या म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे झालेले दोन गट. एकनाथ शिंदेंनी ४० आमदार आणि काही खासदारांसोबत वेगळे जात २०२२ मध्ये शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडले.

त्यानंतर २०२३ मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आणि अजित पवार आणि शरद पवार या काका-पुतण्याच्या जोडीमध्ये मोठी दरी निर्माण झाली. या दोन्ही राजकीय घटनांमुळे एकीकडे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे, तर दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्यात शत्रूचे नाते निर्माण झाले.
पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात प्रथमत: सर्वच राजकीय नेते एका मंचावर उपस्थित राहण्याची शक्यता निर्माण झाली असून या निमित्ताने माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मुंबईतील वरळी येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्र्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये सर्वांत प्रथम नाव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला स्वत: शरद पवार हजर राहण्याची शक्यता फार कमी आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी नेहमीच ब-याच कार्यक्रमांत अजित पवार त्यांच्या बाजूला असतानाही त्यांच्याशी बोलणे तर सोडाच, पण त्यांच्याकडे पाहणे सुद्धा टाळले आहे.

उद्धव ठाकरे-शिंदेंमध्ये अबोला कायम
तर, दुसरीकडे शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून ते आत्तापर्यंत एकदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली नाही. अर्थसंकल्पाच्या अधिवेशनावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांच्या समोरून गेले. मात्र, त्यांनी एकमेकांना दुर्लक्षित केल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR