घरांच्या किमती कमी होणार नसल्याचे स्पष्टीकरण
मुंबई : प्रतिनिधी
महानगरांमध्ये सर्वसामान्यांसाठी घरी उपलब्ध करुन देणारी संस्था म्हणून म्हाडा आणि सिडकोचा लौकिक आहे. मात्र, गेल्या काही वर्षात घरांच्या किंमतीही अव्वाच्या सव्वा वाढल्या. विशेषत: मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईतील घरांच्या किंमती बाजार भावाप्रमाणेच असल्याची ओरड अर्जदारांकडून होत आहे.
घराच्या किमती वाढल्याने अलिकडे संताप व्यक्त होत होता. त्यावेळी सिडको तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सिडकोच्या घरांच्या किंमती कमी करण्यात येतील, असे म्हटले होते. मात्र, त्यांची सिडकोच्या अध्यक्षपदावरून गच्छंती होताच घराच्या किमती कमी होणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले.
सिडकोने जाहीर केलेल्या माझे पसंतीचे घर या योजनेअंतर्गत २६ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु या घरांच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने या किंमती कमी करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन माजी सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले.
मात्र, सिडकोने जाहीर केलेले दर कमी करणार नसल्याचे संकेत सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी दिले. त्यामुळे सिडकोच्या घरांचे स्वप्न पाहणा-या सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झाला. सिडकोने घरांच्या किमती रेडीरेकनरनुसार ठरवल्या असून सिडको अत्याधुनिक सुविधा देत असल्याने घरांच्या किंमती योग्य असल्याचे स्पष्टीकरण सिडकोकडून देण्यात आले. त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किंमतीवरुन नाराज झालेल्या अर्जदारांची नाराजी ही त्यांच्याजवळ ठेवावी लागणार आहे.