29.5 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeलातूरशिवरायांनी स्वराज्यासह स्वराष्ट्र निर्माण केले

शिवरायांनी स्वराज्यासह स्वराष्ट्र निर्माण केले

लातूर : प्रतिनिधी
शिवरायांनी   ऐषोआरामासाठी  महाल बांधले नाही तर स्वराज्यासाठी गडकिल्ले बांधले. जो स्त्रियांचा सन्मान करेल त्यानेच भगव्याला हात लावावा. शिवरायांनी शेतक-यांची व स्त्रियांची लुबाडणूक होणार नाही याकडे विशेष लक्ष दिले. शेतक-यांच्या भाजीच्या देठासही हात लावू नका असे आज्ञापत्र काढणारे शिवराय एकमेव राजे होते. सर्जक म्हणून स्त्रिया व शेतकरी व गुणवत्ता म्हणून मावळयांना चालना दिली. राज्य तेच जिथे शेतकरी व स्त्रियांना सन्मान मिळतो. त्यामुळे शिवरायांनी स्वराज्यासह स्वराष्ट्र निर्माण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब यांनी व्यक्त केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय जिमखाना विभागाच्या वतीने संयुक्तरित्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, अतिथी म्हणून ख्यातनाम साहित्यिक गोरख शेंद्रे, कृषि महाविद्यालय व कृषि व्यवसाय व्यवस्थापन संस्था जीरेवाडीचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य  डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. व्यंकट जगताप, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. अच्युत भरोसे हे उपस्थित होते.
यावेळी शेंद्रे म्हणाले की, शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण सर्वजण एक होत असतो ही शिवरायांच्या विचारांची ताकद आहे. शिवरायांकडे मावळे कमी होते, परंतु जे होते ते निष्ठावंत होते. शिवरायांनी भरकटना-या माणसांना एकत्र आणण्याचे काम केले. यावेळी डॉ.दिनेशसिंह चौहान यांना जीरेवाडी येथील दोन महाविद्यालयांचा पदभार प्राप्त झाल्याबद्दल, तसेच डॉ. मनीषा बगाडे यांचा पदोन्नती झाल्याबद्दल तर सुर्यकांत चिंताले व शांताबाई राठोड यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. बाळासाहेब गुरमे व ज्योती माकणे यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. ठोंबरे म्हणाले की, शेतकरी व महिलांचा विकास या विचारांवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ मुल्यवर्धनाचे कार्य करीत आहे. शेतकरी देवो भव: हा विचार आज विद्यापीठाचा आत्मा आहे.  तसेच आज आपल्याला लाभलेले पाहुणेसुद्धा शिवरायांच्या विचारांशी बांधिलकी जपणारे आहेत. असे सांगून ते म्हणाले की, कृषि पदवीधर विद्यार्थी हेच शिवरायांचे खरे मावळे आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अच्युत भरोसे यांनी तर सूत्रसंचालन पवन कदम व प्रणिता धड्डू यांनी केले. विशाखा भोसले व अनुजा परशेट्टे यांच्या  स्वागतगीत गायनाने वातावरण चैतन्यमय झाले. यानंतर आभार डॉ. अनिलकुमार कांबळे  यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR