मुंबई : प्रतिनिधी
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटर्सपर्यंत शस्त्रे पोहोचविण्यास मदत करणारा नवी मुंबईतील भंगारवाला भागवतसिंग ओमसिंग (वय ३२) याला गुन्हे शाखेने रविवारी अटक केली.न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता १० वर पोहोचली असून, मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम, मोहम्मद झिशान अख्तर यांच्यापर्यंत पोहोचण्यास गुन्हे शाखेला अद्याप यश आलेले नाही. या आरोपींच्या शोधासाठी विविध पथके मुंबईबाहेर आहेत.
आतापर्यंत गुरुमेल सिंग, धर्मराज कश्यप, हरिशकुमार निसाद, नितीन सप्रे, संभाजी पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, राम फुलचंद कानोजिया यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १० जिवंत काडतुसे, शिवकुमार यादव आणि सुमित यादव या नावाचे आधार कार्ड, मोबाईल, सीमकार्ड तसेच अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.