ढाक्का : वृत्तसंस्था
एकीकडे भारत आणि पाकिस्तानात तणावाची परिस्थिती असताना, दुसरीकडे बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांनी शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’वर बंदी आणली आहे. त्यामुळे आता ‘अवामी लीग’ला आगामी निवडणुकीत सहभागी होण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत, असे सांगितले जात आहे.
मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने शनिवारी पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर बंदी घालण्याची घोषणा केली, असे वृत्त आहे. आता अवामी लीग त्यांच्या नावाने आणि चिन्हाने निवडणूक लढवू शकणार नाही. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने घेतलेला निर्णय शेख हसीना आणि त्यांच्या समर्थकांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.
मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत ‘अवामी लीग’वर बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा केली. यासंदर्भातील अधिकृत राजपत्र अधिसूचना लवकरच जारी केली जाणार आहे. तसेच एका निवेदनात असे म्हटले आहे की, देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या हितासाठी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात अवामी लीग आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध खटला पूर्ण होईपर्यंत ही बंदी लागू राहील.
दरम्यान, मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या बंदीचा निर्णय घेण्यात आला. आयसीटी कायद्यात सुधारणा करून न्यायाधिकरणाला कोणत्याही राजकीय पक्षावर, त्यांच्या आघाडीच्या संघटनांवर आणि संलग्न संस्थांवर खटला चालवण्याची परवानगी देण्यात आली.