देवणी : बाळू तिपराळे
तुळशीच्या लग्नानंतर आता लग्नांचा धडाका सुरू झाला आहे. आधी मुलींच्या लग्नाचीचिंता असायची, आता मुली मिळत नसल्याने मुलांच्या लग्नाचीचिंंता वाढली आहे. अलीकडच्या काळात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटली आहे. याशिवाय मुलींनी शिक्षणातही आघाडी घेतली आहे. त्यामुळे एखाद्या खासगी कंपनीत नोकरी करणारा व शहरात वास्तव्यास असणा-या मुलांना पसंती दर्शवली जात आहे. बहुतांश मुली शेतकरी नवरा नाकारत आहेत.
पूर्वी मुला मुलींचे लग्न आई-वडिलांकडून ठरविण्यात येत होते परंतु आता मुलगा व मुलीचे विचारही विचारात घेण्यात येत नव्हते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. बहुतेक मुले व मुली स्वत: आपल्या पसंतीच्या मुलांची तर मुले आपल्या पसंतीच्या मुलींची निवड करतात. सध्या मुलीपेक्षा मुलांच्या लग्नाचीचिंता वाढली. पूर्वी मुलीचे लग्न जुळण्यास फार मोठी अडचण येत होती.किंबहुना सहजासहजी मुलगी मिळत होती मात्र आता मुलाला मुलगी मिळेनाशी झाली आहे. आता मुलीची पसंती अधिक महत्वाची ठरली आहे. कालानुरूप मुलीच्या अपेक्षा वाढल्या असून, नोकरदाराला मुलीकडून अधिक पसंती देण्यात येत आहे. मुलीकडून शासकीय नोकरदारास पहिल्यांदा प्रधान्य देण्यात येत आहे. त्यानंतर व्यावसायिक, खासगी, नोकरदारांना पसंती आहे. मोठ्या प्रमाणात शेती असली तरीही मुलीची शेतक-या प्रति नकार घंटाच आहे. शेतकरी मुलांचे लग्न जुळवताना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे ज्येष्ठ नागरिक रामकिशन शिंदे यांचे म्हणणे आहे.