कर्जमाफीबद्दल आपण बोललो नसल्याचा दावा
पुणे : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. यामध्ये भाजपाचे नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतक-यांचे कर्ज माफ केले जाईल, असे जाहीर केले होते. मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका विधानामुळे शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथील कार्यक्रमात कर्जमाफीबद्दल आपण बोललो नसल्याचे म्हटले. माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली का, असे विधान अजित पवार यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे शेतक-यांना कर्जमाफी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण आहे. खरे तर आंथरूण बघून हातपाय पसरायचे असतात. पण यात काही जमत असेल तर आपण करू. आपण कमी पडणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
तिजोरीची स्थिती
पाहून निर्णय : मुश्रीफ
अजित पवार यांच्यासोबतच त्यांच्याच पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनीही विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. तीन सिलेंडर देण्याची योजना आम्ही बंद करणार नाहीत. महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत आहे. लाडक्या शेतक-यांचे वीज बील आम्ही माफ केलेले आहे. आता राज्य सरकारच्या तिजोरीची परिस्थिती पाहून योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले.