लातूर : प्रतिनिधी
साखर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे पन्नगेश्वर कारखान्यावर आरआरसी (जप्तीची) ची कार्यवाही करून ऊस उत्पादक शेतक-यांना १५ टक्के व्याजाने थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
पन्नगेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्यावर आरआरसी च्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतक-याला अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत. कर्मचा-यांच्या पगारीचे १२.५ कोटी रुपये व तोड-वाहतुकीचे २.५ कोटी रुपये थकवले आहेत. कर्मचा-यांचा २०१९ पासून पीएफ भरलेला नाही. तसेच ग्रॅज्युएटीचेही पैसे दिलेले नाहीत. आता तर पन्नगेश्वर शुगर मिल्स लि. पानगाव या कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना विकत घेतलेल्या प्रशासनाकडे शेतकरी, कर्मचारी, तोडणी वाहतूकदार गेले असता त्यांनी या कारखान्याचे शेतक-यांचे जुने सर्व शेअर्स रद्द केल्याचे, शेतक-यांच्या कोणत्याही थकीत बिलाचा आमचा संबंध नाही. तसेच जुन्या कर्मचा-यांना कामावर घेणार नाही व कर्मचा-यांच्या थकीत पगारीचा व तोड वाहतूकदारीच्या पैशाचाही आमचा संबंध नाही असे सांगण्यात आले आहे. या विरोधात कारखाण्यासमोर कर्मचा-यांनीे साखळी उपोषणही केले.
या सर्वांना सोबत घेऊन मनसेच्या वतीने पन्नगेश्वर मोर्चाही काढला. तसेच मनसेच्या वतीने साखर आयुक्त, पुणे यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. परंतु अद्यापपर्यंत पन्नगेश्वर कारखान्याकडून या संदर्भात कसल्याही प्रकारचा सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. याउलट या प्रत्येक आंदोलनाच्या वेळी कारखान्याचे नवीन व्यवस्थापन बीड जिल्ह्यातून गुंडांच्या गाड्या घेऊन कारखान्यावर येत आसून कर्मचारी व शेतक-यांना ते गुंड लोक धमक्या देत आहेत. त्यामुळे पुढील काळात शेतकरी व कर्मचा-यांच्या जीवाला या गुंडांकडून धोकाही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गंभीर बाबीकडे आपण जातीने लक्ष घालून साखर आयुक्त यांच्या आदेशाची अंमलबजावणी करून तात्काळ शेतक-यांना त्यांच्या थकीत ऊसबिलाचे पैसे मिळवून द्यावेत.
तसेच कर्मचारी व तोडनी वाहतूकदार यांच्यावरीलही अन्याय दूर करावा. सर्व ५७४ कर्मचा-यांना त्यांच्या जुन्या वेतनश्रेणीसहीत कामावर रुजू करून घ्यावे. शेतक-यांचे शेअर्स नियमित करून घेण्यात यावेत. या सर्वांचे थकीत पैसे दिल्याशिवाय कारखान्यास गाळपाचा परवाना न देण्याची शिफारस साखर आयुक्त पुणे यांना जिल्हाधिकारी यांनी करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी व कर्मचारी यांना घेऊन दि. ६ ऑगस्ट रोजी पन्नगेश्वर कारखान्यासमोर कुटुंबासह ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदणाद्वारे देण्यात आला.
यावेळी मनसे शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे, शेतकरी सेना प्रदेशउपाध्यक्ष भागवतराव शिंदे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष पांडुरंग कदम, जिल्हा उपाध्यक्ष रवी सूर्यवंशी, मनविसे राज्यउपाध्यक्ष किरण चव्हाण, शहर संघटक बजरंग ठाकूर, कर्मचारी संघटनेचे सोमनाथ फुलारी, गणपत कातकडे, बंडू दहिफळे, आनंत दहिफळे उपस्थित होते.