पुणे : प्रतिनिधी
शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतक-याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे अॅग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
पुणे अॅग्री हॅकॅथॉनच्या पारितोषिक वितरण आणि समारोप सभारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे, आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतीचा उत्पादन खर्च वाढतो आहे आणि त्यासोबत शेतीसाठी आवश्यक पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. हॅकॅथॉनमध्ये मांडलेले तंत्रज्ञान शेतक-यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.जलसिंचन, पीक काढणी, पिकांवर फवारणीचे तंत्रज्ञान, एआय कंन्ट्रोल रोव्हर्स, कीड व्यवस्थापनात मशिन लर्निंगचा उपयोग, शेल्फ लाईफ वाढविणारे ड्रायर्स, शेतमालाचे प्राण्यांपासून संरक्षण, काढणी पश्चात प्रक्रियेचे तंत्रज्ञान आदी उत्कृष्ट प्रकारचे तंत्रज्ञान मांडण्यात आले आहे.
हे उपाय शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे उत्तम उत्पादनात रुपांतर करून ते बाजारापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. त्यासाठी कृषि विभागाने पुढाकार घेऊन कृषि महाविद्यालयांमध्ये इन्क्युबेशन केंद्रे तयार करावीत आणि या तंत्रज्ञानांचे व्यावसायिक उत्पादनाच्या रूपात विकसित करून शेतक-याला लाभ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.