22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रशॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक

शॉर्टसर्किटने ३ कंपन्या खाक

खैरणे एमआयडीसीत कापूर बनविताना उडाली ठिणगी

नवी मुंबई – खैरणे एमआयडीसीमधील तीन कंपन्या मंगळवारी सकाळी जळून खाक झाल्या. यातील एका कंपनीत शॉर्टसर्किट झाल्याने कापराच्या पावडरवर ठिणगी उडाल्याने भडका झाला. या भीषण आगीने आजूबाजूच्या दोन कंपन्यांनी पेट घेतला.

तिन्ही कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने चौथ्या कंपनीला झळ बसली नाही. सकाळी १० च्या सुमारास खैरणे एमआयडीसीमधील नवभारत इंडस्ट्रिज या कंपनीत अचानक आग लागली. या कंपनीत कापूर, डांबरगोळ्या बनवण्याचे काम सुरू असताना एका मशिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. कामगारांनी आग शमविण्याचा प्रयत्न केला मात्र, काही क्षणात कापराच्या पावडरमुळे आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचा भडका पाहून कामगारांनी कंपनीबाहेर पळ काढला. तोपर्यंत कापूरसाठा व केमिकलने पेट घेतल्याने शेजारच्या गोयंका व जस्मिन या दोन कंपन्यांमध्ये आग पसरली.

आग लागल्याची माहिती मिळताच एमआयडीसी, पालिका, ओएनजीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आगीमध्ये होणारे छोटे-मोठे स्फोट व आगीच्या भडक्यामुळे इतरही कंपन्यांना धोका निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी कामगारांच्या मदतीने लगतच्या कंपन्यांमधील ज्वलनशील पदार्थ, गॅस सिलिंडर बाहेर काढले. मात्र, कापूर व डांबरगोळ्यांचा साठा तसेच गोयंका गोडाऊनमधील साहित्य उशिरापर्यंत जळत असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR