चाकूर : प्रतिनिधी
वडवळ नागनाथ वनौषधी, भक्ती आणि पर्यटनासाठी तसेच पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक आणि वैज्ञानिक महत्त्व असलेल्या मराठवाड्यातील प्रसिद्ध वडवळ नागनाथ (ता.चाकूर) येथील संजीवनी वनौषधी बेटावर वन विभागामार्फत प्रस्तावित केलेल्या विविध कामांना शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर ती कामे अधिक व्यवस्थित आणि दर्जेदार होतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी मंगळवारी (ंिद.५) बेटाची पाहणी करत वृक्षारोपण केल्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना दिली.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आणि पर्यावरणप्रेमी शिवशंकर चापुले यांनी जिल्हाधिका-यांंना बेटावरील वनौषधींची माहिती दिली. बेटावरील वनसंपदा आणि नैसर्गिक वातावरण पाहून जिल्हाधिकारी निसर्गाशी एकरूप झाल्या होत्या. शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाशिवाय बेटाच्या पायथ्याला प्रवेशद्वार, रस्ते तसेच वनौषधींची माहिती सांगणारे फलक लावण्याच्या सूचनाही दिल्या.याप्रसंगी त्यांच्यासोबत अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी, चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर, जिल्हा प्रशासन अधिकारी रामदास कोकरे, अहमदपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी अपेट, चाकूरचे वनपाल सुरेश मस्के, वनरक्षक मीरा बोंबले, मंडळ अधिकारी श्याम कुलकर्णी, तलाठी शंकर लांडगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रारंभी ग्रामपंचायत सभागृहात जिल्हाधिकारी यांचा वृक्ष आणि वह्या देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सरपंच मुरलीधर सोनकांबळे उपसरपंच बालाजी गंदगे, ग्रामपंचायत सदस्य कॉमेश कसबे, ग्रामविकास अधिकारी विजयानंद देशमुख, ज्ञानेश्वर बेरकिळे, राजकुमार मोहनाळे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.