नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनातून निलंबित करण्यात आलेले विरोधी खासदार संसदेच्या संकुलात निदर्शने करत होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत गांधी पुतळ्यासमोर धरणेही धरले. यानंतर ते संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चर्चा करत होते. त्याचवेळी, टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली ज्यामुळे ते चांगलेच संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.
या घटनेला लज्जास्पद असल्याचे सांगून जगदीप धनखड म्हणाले की, एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार त्या घटनेचा व्हीडीओ बनवत आहे हे हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. अधोगतीला मर्यादा नाही. मी टीव्हीवर एक व्हीडीओ पाहिला ज्यामध्ये एक मोठा नेता व्हीडीओ बनवत आहे, तर दुसरा खासदार माझी नक्कल करत आहे. जेव्हा टीएमसीचे खासदार मिमिक्री करत होते तेव्हा राहुल गांधी, प्रमोद तिवारी, जयराम रमेश, मनोज झा, डी राजा, कार्ती चिदंबरम असे अनेक ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते.
१३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेबाबत दोन्ही सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाची मागणी विरोधक करत आहेत. या मागणीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात गदारोळ केला. या गदारोळानंतर १४ डिसेंबरला टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतील हिवाळी अधिवेशनासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले. दुस-याच दिवशी काही खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. आतापर्यंत दोन्ही सभागृहातील ९२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.