27.8 C
Latur
Saturday, August 23, 2025
Homeराष्ट्रीयसंसद भवन सुरक्षेत बेफिकिरी; गरुडद्वारात गेला अज्ञात व्यक्ती

संसद भवन सुरक्षेत बेफिकिरी; गरुडद्वारात गेला अज्ञात व्यक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संसद भवनाच्या सुरक्षेत पुन्हा एकदा मोठी चूक समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीने राज्यसभा सभागृहात अनधिकृतपणे प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सुरक्षा कर्मचा-यांनी त्याला पकडले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. तपासादरम्यान, ही व्यक्ती उत्तर प्रदेशातील असल्याचे समोर आले. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दुस-याच दिवशी हा सगळा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली.

शुक्रवारी संसद भवनात एक व्यक्ती भिंतीवरून उडी मारून आत घुसली होती. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील भदोही येथील रहिवासी राम कुमार बिंद नावाच्या व्यक्तीला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले. ही घटना सकाळी ५:५० वाजता घडली, जेव्हा तो रेल भवनच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून नवीन संसद भवनाच्या गरुड गेटवर पोहोचला. संसद भवनात उपस्थित सुरक्षा कर्मचा-यांनी त्या व्यक्तीला पकडले.

प्राथमिक चौकशीत, त्या व्यक्तीचे नाव राम कुमार बिंद (२०) असे आहे, जो भदोही जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो सुरतमधील एका कारखान्यात काम करतो आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे दिसून येते. पुढील चौकशी सुरू आहे, असे सीआयएसएफने म्हटले. २०२३ मध्येही संसद हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षेत मोठी चूक झाली होती. शून्य प्रहरात, लोकसभेच्या गॅलरीतून दोन जणांनी सभागृहाच्या मजल्यावर उडी मारली आणि कॅनिस्टरमधून पिवळा गॅस सोडला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR