भारतामध्ये संस्कृती आणि विकृती हजारो वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. संस्कृतीचे कौतुक होत असताना विकृतीवर कडाडून हल्लाही केला जातो. परंतु विकृतीचा समूळ नायनाट झाल्याचे दिसत नाही. अधूनमधून विकृती डोके वर काढताना दिसते. देशातील नागरिक त्रेतायुगातील परंपरा पाळताना चंद्र आणि मंगळावर घरे बांधण्याच्या योजनाही आखताना दिसतात. कृषिप्रधान देश असल्याने हजारो वर्षांपासून शेतीमध्ये बैलांचा वापर सुरू आहे तर दुसरीकडे पॉलिहाऊसमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापरही होताना दिसतो. राजकारण, समाजकारण, साहित्य, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रांत हेच चित्र दिसते. गत महिन्यात मौनी अमावास्येला गंगेत पापे धुऊन टाकण्यासाठी कोट्यवधी लोकांनी प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले. याच दिवशी सकाळी इस्रोने आपले शंभरावे उड्डाण केले. भारतीयांना या दोन्ही गोष्टींचा अभिमान आहे. महाकुंभामध्ये आतापर्यंत सुमारे ४५ कोटी भाविकांनी पवित्र स्नान केल्याचे सांगितले जाते.
याच काळात देशात ‘इंडियन गॉट लेटेंट’ नावाचा तथाकथित कॉमेडी शो चालू होता. या शोमध्ये अत्यंत खालच्या दर्जाचे संभाषण, खुलेआम शिवीगाळ चालत असते. शोमध्ये भाग घेणा-यांत तरुण मुले-मुली अधिक असतात. मुलीसुद्धा मुलांच्या बरोबरीने शिवीगाळ करतात. या सा-यातून जी खसखस पिकते त्याला विनोद असे म्हटले जाते. खरे तर हा विनोद नव्हे तर पांचटपणाच! काही दिवसांपूर्वी रणवीर अलाहाबादियाच्या यूट्यूबवरून मोठा वाद झाला. बीअर बायसेप्स या यूट्यूब चॅनेलमुळे तो परिचित आहे. आपल्या शोमध्ये त्याने, तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचे थांबवायला आवडेल, असा प्रश्न केला. त्याच्या या वादग्रस्त प्रश्नावरून मोठा गहजब झाला. आता त्याच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. विनोदाच्या नावाखाली त्याच्या शोमधून पांचटपणा आणि हीन दर्जाचे जोक्स केले जातात. असा हा कचरा शो देशातील कोट्यवधी लोक पाहतात म्हणे.
यूट्यूबवर हा शो इतका लोकप्रिय आहे की त्याचे महिन्याचे उत्पन्न दोन कोटी रुपये तसेच त्याचे दीड कोटी फॉलोअर्स आहेत म्हणे. हा शो पाहणा-यांपैकी बरेचजण प्रयागराजला जाऊन डुबकी मारून आले असतील. अनेकजण अयोध्येला नव्या राम मंदिरात जाऊन आले असतील. अनेकजण पंतप्रधान मोदी व भाजपचे समर्थक असतील. मोठ्यांचा आदर केला पाहिजे, आपली जुनी संस्कृती जपली पाहिजे असेही त्यांना वाटले असेल. या सा-यांनी रणवीरच्या शोमधील हीन अभिरुचीचा धिक्कार केला पाहिजे. रणवीरचा गतवर्षी नरेंद्र मोदींनी दिल्लीत गौरव केला होता. रणवीर श्रोत्यांना संभोगाकडून समाधीकडे नेत आहे काय असा प्रश्न पडतो. आदिम काळात माणसे एकमेकांचा विचार नर-मादी असा करत असतीलही पण आपण तेथून उत्क्रांत होऊन आजच्या स्थितीला आलो आहोत. मानवी समाजात आपण नाती मानतो. त्यांचा आदर करतो. आई-वडील, गुरू, बहीण यांचे नाते पवित्र मानले जाते.
सभ्य व सुसंस्कृतपणाची ती एक खूण आहे. काही वेळा या संस्कृतीतील नाती जाचक होऊ शकतात आणि त्याविरुद्ध बंडही होऊ शकते. १९६०च्या दशकात हिप्पी समाज निर्माण झाला तो याच बंडातून. हिप्पी म्हणजे अनिर्बंध लैंगिक संबंध, उघड्यावर बेबंद वागणे, व्यसन करणे. हिप्पी संस्कृतीतून नवे संगीत, कला व वेगळा विचार जन्माला घालण्याचा प्रयत्न झाला होता. रणवीर आणि त्याचे साथीदार जे बोलत वा वागत आहेत ते अत्यंत हिणकस आहे. त्यामागे कोणताही बंडाचा विचार नाही. ही सारी बड्या बापाची कार्टीं आहेत. अधिकाधिक पैसा व प्रसिद्धी मिळवणे हेच त्यांचे ध्येय आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा विनोदवीर समय रैनाचा शो आहे. त्यात बोलताना रणवीर अलाहाबादियाने अश्लील शब्दांचा वापर केला. त्याने ज्या विषयावरच्या चर्चेला तोंड फोडले त्यात मर्यादा व भान ठेवणे आवश्यक होते. ज्या गोष्टी करायला अथवा बोलायला नको त्यांची जाहीर वाच्यता करण्याचा आगाऊपणा रणवीरने केला.
त्यानंतर प्रांत आणि स्तर याबाबतचा कोणताही विचार न करता लोक रणवीरवर तुटून पडले हे चांगले झाले. राजकीय मतभेद असणा-यांनाही त्याच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली आणि व्यक्त व्हावे लागले. भारतीय समाजात अथवा सभ्य समाजात काही मर्यादा पाळाव्या लागतात. त्यासाठी जगावेगळे असे काही करावे लागत नाही. मात्र, जे विषय वर्ज्य आहेत त्यावर बोलणे टाळावे लागते. कुटुंबात काही गोष्टी अशा असतात ज्यावर बोलायचे नसते शिवाय बाहेरसुद्धा काय बोलायचे, कशावर आणि कुठपर्यंत बोलायचे याचे एक सूत्र असते. त्याबाबतची कोणतीही नियमावली नाही मात्र संकेत आहेत, ते पाळावे लागतात. कुटुंबात वडिलधा-यांसमोर, कनिष्ठांसमोर काय बोलायचे याचे भान ठेवावे लागते. विनोदाचे अथवा कॉमेडीचे थोडेसे वेगळे आहे. लोकांना हसवणे कठीण असते. विनोदाला कोणताही विषय वर्ज्य नाही, म्हणूनच ‘टवाळा आवडे विनोद’ असे म्हटले जाते. असे असले तरी विनोद करताना तारतम्य हे बाळगायलाच हवे.
नाहीतर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. सध्या युवकांच्या विचाराचा स्तर पाहता आपण आधुनिकतेच्या नावाखाली नीतिमूल्यांनाच तिलांजली देत आहोत काय असा प्रश्न पडतो. आपल्या आई-वडिलांबाबत बोलताना किंचितही लाज वाटू नये एवढी ही पिढी निर्ढावली कशी? पूर्वी मोजकी माध्यमे होती. त्यांना नैतिक आणि सामाजिक धाक होता. त्यावर वयाने व अनुभवाने ज्येष्ठ असलेली मंडळी छाननीसाठी उपलब्ध होती. आज माध्यमांचा भडिमार झाला आहे. त्यांचा स्वच्छंदी वापर सुरू आहे. स्टँडअप कॉमेडी, इंटरनेट मीडिया अथवा ओटीटी अशा माध्यमातून अश्लीलतेचा अनिर्बंध आणि भयमुक्त प्रसार सुरू आहे. काय बोलायचे, काय करायचे आणि काय दाखवायचे याबाबत कसलेच बंधन राहिलेले नाही. त्यामुळे रणवीर, समय रैना यासारख्यांची पैदास होतच राहणार!