19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीसकल मराठा समाजाचे येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन

सकल मराठा समाजाचे येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन

जिंतूर : तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार, दि.२४ जूलै रोजी सकाळी ११ वाजता येलदरी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर जलसमाधी आंदोलनाला उपस्थिती होती.

मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा व सरकारच्या वेळकाढू धोरणाचा जाहीर निषेध म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आले. मागील ५ दिवसांपासून जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण व सगेसोयरे अध्यादेश काढावा या मागणीसाठी आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या कायदेशीर मागण्यांचा सरकार मुद्दामहून विचार करत नसल्याचे दिसत आहे. या शिवाय धाराशिव येथे धनंजय पाटील यांच्या उपोषणाकडे देखील दुर्लक्ष करत असल्याने सरकार विरुद्ध प्रचंड रोष निर्माण झालेला असून संपूर्ण मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे आंदोलकाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी मराठा समाजाच्या वतीने सरकारने लवकर सगेसोयरे कायद्याची अमंलबजावणी करावी, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घ्यावी यासह इतर मागण्या करत जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलन स्थळी तहसिलदार राजेश सरवदे, नायब तहसिलदार प्रशांत राखे, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांनी भेट दिली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR