16.9 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeलातूरसकारात्मक कार्यशैली म्हणजेच यशस्वीतेकडे वाटचाल

सकारात्मक कार्यशैली म्हणजेच यशस्वीतेकडे वाटचाल

लातूर : प्रतिनिधी
आजच्या स्पर्धात्मक जगात यशस्वी होण्यासाठी योग्य दृष्टीकोन आणि सकारात्मक कार्यशैलीची गरज अधिक महत्त्वाची ठरते. सकारात्मक कार्यशैली म्हणजे समस्या नव्हे, तर संधींवर लक्ष केंद्रित करणे. अशा दृष्टिकोनाने व्यक्ती केवळ आपली उद्दिष्टे साध्य करत नाही, तर कार्यप्रवाह अधिक सुलभ, सर्जनशील आणि प्रेरणादायी बनतो. सकारात्मक कार्यशैली म्हणजेच यशस्वीतेकडे वाटचाल असे मत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक डॉ. अर्शद सय्यद यांनी केले. दयानंद इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन या एक दिवसीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. वाजिद चाऊस, प्रा. अरुण कोंडापुरे, प्रा. सुरज मुळजे, प्रा. प्रतिक चिंचोले, प्रा. ओम पाटील उपस्थित होते.
व्यक्तिमत्व विकास आणि करिअर मार्गदर्शन हे दोन महत्त्वाचे घटक आहेत, जे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी बनवतात. आजच्या काळात केवळ शिक्षण असून चालत नाही, तर त्या सोबतच योग्य व्यक्तिमत्व आणि करिअरच्या योग्य निवडीसाठी मार्गदर्शन आवश्यक ठरते. व्यक्तिमत्व विकास म्हणजे फक्त बा  स्वरूप सुधारणे नव्हे, तर आपल्या विचारसरणी, संवादकौशल्य, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास वाढवणे होय, असे सांगून डॉ. सय्यद म्हणाले की, करिअरची योग्य निवड करणे हे जीवनातील एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. आजच्या वेगवान युगात विविध संधी उपलब्ध आहेत, पण योग्य संधी कशी निवडावी यासाठी मार्गदर्शनाची गरज भासते. आपल्या आवडी, कौशल्ये आणि बाजारातील मागणी यांचा ताळमेळ साधून घेतलेला निर्णय आपल्यासाठी नेहमीच योग्य ठरतो.
 त्यामुळे आपण जे करू शकतो त्यावर आत्मविश्वासाने निवड करा, तसेच कोणत्या कौशल्यांमध्ये तुम्ही पारंगत आहात हे जाणून घ्या आणि हाच मंत्र तुम्हाला यशस्वी बनवेल. स्वत:वर विश्वास ठेवा, योग्य दिशा निवडा आणि यशस्वी भविष्यासाठी आजपासूनच पुढे पाऊल टाका असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैष्णवी राऊत यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यलयातील सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी तसेच बी. फार्मसी व डी. फार्मसीच्या प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील १३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR