लातूर : प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघून अपडेट राहण्याचा प्रयत्न करावा, काळानुसार स्वत:ला अपडेट ठेवत गेल्यास यशाचा पासवर्ड मिळतोच, असा विश्वास नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त्त केला. येथील कॉक्सिट महाविद्यालयातील विविध नामांकित आयटी कंपन्यांमध्ये नोर्कया मिळालेल्या १३९ विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार डॉ. चासकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील होते. यावेळी कॉक्सिटचे प्राचार्य डॉ. एन. एस. झुल्पे, तज्ज्ञ संचालक एन. डी. जगताप, उपप्राचार्य डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. डी. आर. सोमवंशी, टे्रंिनग व प्लेसमेंट प्रमुख प्रा. कैलास जाधव उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. चासकर म्हणाले, कॉक्सिट महाविद्यालय ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण देऊन जागतिक पातळीवरील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देत आहे, हे काम कौतुकास्पद आहे. पदवी पूर्ण होण्यापूर्वीच महाविद्यलयातील १३९ विद्यार्थ्यांना नोक-या मिळवून देणे, त्यांचा पालकांच्या उपस्थितीत सत्कार घडवून आणणे हे काम कौतुकास्पद आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात टिकून राहण्यासाठी शिक्षक व प्राध्यापकांनीही आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्याची गरज आहे. आता पहिल्यासारखा आळस करून जमणार नाही, यापुढील काळात प्रत्येक महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, त्यांच्यावर विद्यापीठातून नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.