23.8 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeक्रीडासनरायझर्सने आरसीबीची घोडदौड रोखली

सनरायझर्सने आरसीबीची घोडदौड रोखली

पहिल्या स्थानी पोहोचण्याची संधी गमावली
लखनौ : वृत्तसंस्था
सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या १८ व्या मोसमातील ६५ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ४२ धावांनी मात केली आहे. हैदराबादने आरसीबीला विजयासाठी २३२ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, हैदराबादच्य्ह्याा गोलंदाजांनी आरसीबीला १९.५ ओव्हरमध्ये १८९ धावांवर गुंडाळले. हैदराबादचा हा या हंगामातील पाचवा विजय ठरला.

प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या आरसीबीला या सामन्यात विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचण्याची संधी होती. मात्र, हैदराबादने आरसीबीला नंबर १ होण्यापासून रोखले. इतकेच नाही तर आरसीबीला या पराभवामुळे नेट रनरेटमध्येही फटका बसला. आरसीबीची पॉइंट्स टेबलमध्ये दुस-या स्थानावरुन तिस-या स्थानी घसरण झाली. तसेच नेट रनरेटमध्येही फटका बसला. आरसीबीचा नेट रनरेट हा सामन्याआधी +०.४८२ असा होता. तोच नेट रनरेट पराभवानंतर +०.२५५ असा झाला.

दरम्यान, त्याआधी आरसीबी कर्णधार जितेश शर्मा याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडले. हैदराबादने २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावून २३१ धावा केल्या. हैदराबादसाठी ईशान किशनने सर्वाधिक ९४ धावांचे योगदान दिले. ईशानच्या या खेळीत ७ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. ओपनर अभिषेक शर्माने ३४ रन्स केल्या. अनिकेत वर्माने २६ तर हेन्रिक क्लासेनने २४ धावा केल्या. ट्रेव्हिस हेडने १७ धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. नितीश रेड्डीने ४ धावांचे योगदान दिले तर अभिनव मनोहर आणि पॅट कमिन्स जोडी नाबाद परतली. अभिनवने १२ तर पॅटने १३ रन्स केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाने धमाकेदार सुरुवात करत ८० धावांची सलामी दिली. विराट कोहली ४३ धावांवर बाद झाला तरी फिल सॉल्ट दमदार फटकेबाजी करत होता. सॉल्टने ३२ चेंडूंत ६२ धावा केल्या आणि तो बाद झाला. त्यानंतर आरसीबीचा संघ अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळाले. कारण रजत पाटीदारही १८ धावांवर धावचीत झाला होता. त्यानंतर हंगामी कर्णधार जितेश शर्माही बाद झाला. त्यामुळे आरसीबीची घसरण सुरू झाली आणि १९.५ षटकांत आरसीबीला १८९ धावाच करू शकली. त्यामुळे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR