सोलापूर-विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून लकी चौकातील सपाटे यांच्या शिवपार्वती हॉटेलसमोर सर्वपक्षीय मराठा समाजाच्या नेतेमंडळींनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजी केली तर हरिभाई देवकरण प्रशालेपाठीमागील स्वयंघोषित मनोहर सांस्कृतिक भवनचे नामफलक उखडून त्याठिकाणी समाजभूषण बाबासाहेब गावडे सांस्कृतिक भवनचे नामफलक झळकविले.
काही दिवसांपूर्वी एका महिलेने सपाटे यांच्याविरोधात पोलिसात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. सपाटे हे मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष असून या संस्थेअंतर्गत छत्रपती शिवाजी प्रशाला आहे. त्यामुळे मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी प्रशालेची बदनामी होत असल्याने मराठा समाजातील नेतेमंडळी व कार्यकत्यांचा सपाटे यांच्याविषयी रोष आहे. हा रोष आंदोलनातून व्यक्त झाला.
यावेळी मनोहर सपाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांच्यावर विनयभंग नाही तर अत्याचाराचा गुन्हा दाखल करा, त्यांना ताब्यात घेऊन मराठा समाज सेवा मंडळातीलभ्रष्टाचाराची चौकशी करा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, शिवसेना ठाकरे गटाचे पुरुषोत्तम बरडे, प्रताप चव्हाण, तुकाराम मस्के, सुनील शेळके, सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार, शिवसेना शिंदे गटाचे अमोल शिंदे, काँग्रेसचे सुनील रसाळे, विनोद भोसले, भाजपचे अनंत जाधव, राजन जाधव, लहू गायकवाड, योगेश पवार, श्रीकांत घाडगे, हरिभाऊ चौगुले, विठ्ठल शिंदे, किरण पवार, श्याम कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते. यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मराठा समाज सेवा मंडळामध्ये अध्यक्ष या नात्याने मनोहर सपाटे यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला आहे. शिक्षकांकडून लाखो रुपये घेऊन स्वतःची मालमत्ता वाढविली आहे. समाजाला विश्वासात न घेताच त्यांचा कारभार सुरू होता. त्यामुळे मराठा सेवा मंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करून या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर दौऱ्यात भेट घेऊन करणार असल्याचे दिलीप कोल्हे, अमोल शिंदे व राजन जाधव यांनी सांगितले.