22.2 C
Latur
Sunday, September 21, 2025
Homeसंपादकीय विशेषसमानतेची पताका उंचावणारी आषाढी वारी

समानतेची पताका उंचावणारी आषाढी वारी

यंदा आषाढी एकादशी दिनांक ६ जुलै २०२५ ला आहे. नामदेव, तुकाराम, विसोबा खेचर, सावता माळी, सेना, बंका, दामाजी पंत, जनाई, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळा, चोखोबा, कान्होपात्रा हे विविध जातींचे संत होते. त्यांनी कर्मठ समाजाचा उपहास, निंदा सहन केली. पण विठ्ठल भक्ती हा समान धागा त्यांना आत्मिक भावाने समतेचा संदेश देत राहिला. केवळ हिंदूच नाही तर अन्य धर्मीय देखील विठ्ठलास मानतात. परदेशांतून देखील अनेक पर्यटक यासाठी येतात. भागवत धर्माचे वारकरी पताका, दिंडी, पालख्या घेऊन लाखोंच्या संख्येने विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. ८०० वर्षांहूनही अधिक याचा इतिहास आहे. वैष्णवांसाठी हा एक भक्तिसोहळा असतो. भक्त पुंडलिक यांना वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जाते. हैबतबाबा हे सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे देशमुख होते. हैबतबाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभासह, थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली.

१२९१ मध्ये ज्ञानेश्वर आळंदी येथून पंढरपूरपर्यंत पायी चालत गेले. तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव-नामदेवांच्या समकालीन होते. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती. स्वत: तुकोबा चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपूरला जात असत. तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले. अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात.शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिरांची पालखी येते. तसेच, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, सावता माळी, रामदास स्वामी यांच्या पालख्याही दर्शनासाठी पंढरीस येतात
हौसे, नवसे, गवसे या वारीत सामील होतात. त्यामुळे पोलिस देखील वारकरी वेशात वावरतात. चोर, पाकीटमार यांच्यावर नजर ठेवतात. अनेक साहित्य संस्था वारीमध्ये सहभागी होतात आणि प्रबोधन करणे, मनोरंजन करणे अशी कामे करतात. चार पावले वारीत चालावीत असे म्हणतात. पण, काहींनी वारीला इव्हेंट केले आहे.

वारीमध्ये वारकरी फुगड्या खेळतात, नाचतात. वाटेत, प्रवासात मुक्कामी दिंडी थांबली की प्रवचन, कीर्तन केले जाते. लोक वारक-यांसाठी महाभोजन ठेवतात. वाटेत अनेक समाजकार्य करणा-या संस्था औषधोपचार, पाणी वगैरेंची व्यवस्था करतात. आषाढी वारीचे वैशिष्ट्य म्हणजे रिंगण आणि धावे होय. कडूस फाटा, वेळापूर आणि वाखरी येथे रिंगण होते. वारकरी रिंगण धरून हरिनामाचा गजर करतात. ज्ञानेश्वर माऊली यांचा अश्व या रिंगणात धावतो. पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज ंयांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत धावत गेले. म्हणून वेळापूरपासून वारकरी पंढरपूरपर्यंत धावत जातात. याला धावे म्हणतात. आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दुपारी, रात्री भोजनात उपवासाचे राजगिरा, साबुदाणा, बटाटा, रताळे, वरई, शेंगदाणे यापासून तयार केलेले विविध पदार्थ सेवन केले जातात. केळी आदी फळांचा देखील समावेश असतो.

जे पंढरपूर येथे जाऊ शकत नाहीत ते स्थानिक विठ्ठल मंदिरांत देवदर्शन करतात. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणा-या देवशयनी एकादशीला हरिशयनी असेही म्हटले जाते. देवशयनी एकादशीबद्दल असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेषनागावर झोपी जातात. धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याचं एक वर्ष हे देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा दिवस असतो. आषाढ महिन्यातील कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणून आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असे म्हटले जाते. यानंतर भगवान विष्णू कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. हा काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो आणि हा पावसाळ्यासोबतच असतो.

कार्तिकी एकादशीला पालख्यांची परत वारी होते. शयनी एकादशी म्हणजे चातुर्मासाची सुरुवात. या दिवशी विष्णूला प्रसन्न करण्यासाठी उपासना आणि उपवास केले जातात.भविष्योत्तर पुराणात, कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे. कारण निर्माता-देव ब्रह्मदेवाने त्याचा पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते. राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली आहे. धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता, परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही. अखेरीस, अंगिरस ऋषींनी राजाला देव-शयनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला. असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला. समता, समानता यालाच भाविकजन महत्त्व देतात. जाती, धर्म, लिंग, वंश, भेद न मानता अखंडपणे चालणारी आषाढ वारी हे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक वैभव आहे.

बाबू फिलीप डिसोजा (कुमठेकर)
मोबा. : ९८९०५ ६७४६८

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR