रत्नागिरी : प्रतिनिधी
प्लास्टिकचे प्रदूषण, अतिमासेमारी, खारफुटीची तोड यामुळे २०२५ पासून कार्बनचे शोषण करणारी समुद्री यंत्रणा कोलमडण्याची भीती जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. के. कथीरेसन यांनी व्यक्त केली. समुद्रात जवळपास ९३ टक्के कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतला जातो. वर्षाला ३० टक्के कार्बन काढून टाकला जातो. पृथ्वीवरील ९३ टक्के उष्णतेचे नियंत्रणही येथेच केले जाते. समुद्रावरच मनुष्य जीवन अवलंबून आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
प्लास्टिकचे प्रदूषण, अतिमासेमारी, खारफुटीची तोड यामुळे २०२५ पासून कार्बनचे शोषण करणारी समुद्री यंत्रणा कोलमडण्याचा धोका असल्याने समुद्राचे संवर्धन आणि खारफुटीची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे, असे ते म्हणाले. आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनतर्फे मत्स्य महाविद्यालयात तृतीय सागर महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कथीरेसन बोलत होते. डॉ. कथिरेसन हे एक जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भारताच्या किनारपट्टीवर व्यापक क्षेत्रीय अभ्यास केला आणि सुमारे ४ हजार जैविक प्रजातींचे संकलन केले. जगातील इतर कोणत्याही देशात खारफुटीच्या जंगलात इतक्या प्रजाती आढळल्या नाहीत. त्यांनी एका नवीन खारफुटी प्रजातीचा शोध लावला आणि तिला त्यांच्या विद्यापीठाच्या नावावरून रायझोफोरा अन्नामालयन असे नाव दिले.
डॉ. कथीरेसन यांनी अतिशय अभ्यासपूर्ण व खास शैलीत विद्यार्थी व अभ्यासकांशी संवाद साधला. भारताला लाभलेला ८ हजार किलोमीटरचा समुद्रकिनारा, किनारपट्टीवरील मंदिरे, उत्सव यांची माहिती दिली. खारफुटी, कोरल्स, समुद्री गवत, खडकाळ व वाळूमय किनारे, खाड्या, मीठागरे यांची माहिती दिली. समुद्राची जैवविविधता सांगताना मासे, पक्षी, कासव, व्हेल, खेकडे अशी विविधता सांगितली.
उद्घाटनावेळी मंचावर राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे आणि आसमंतचे अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन उपस्थित होते. यावेळी आसमंत बेनवोलन्स फाउंडेशनसोबत गोव्यातील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) सामंजस्य करार करणार असल्याची माहिती या संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नरसिंह ठाकूर यांनी दिली.
भारतात जगात दुस-या
क्रमांकाचे मासे उत्पादन
भारताच्या ८ हजार किमी समुद्र किनारपट्टीवर ४८६ शहरे व ३ हजार ४७७ खेडेगाव, वाड्यांमध्ये ३० टक्के लोक राहतात. जगात द्वितीय क्रमांकांचे माशांचे उत्पादन भारतात होते. २८ दशलक्ष लोकांची रोजीरोटी यावर अवलंबून आहे. ब्लू इकॉनॉमीअंतर्गत ४ टक्के जीडीपी व ९५ टक्के व्यापार म्हणजे मच्छीमारी, शेती व मत्स्य शेती, पर्यटन, सीविड फार्मिंग, बंदरे यावर अवलंबून आहे, असे डॉ. कथीरेसन म्हणाले.