सातारा : इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळणार हे निश्चित होते, आज मात्र महायुती सरकारने ख-या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण देऊन न्याय दिला आहे, असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने मांडलेल्या भूमिकेनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पत्रकारांशी साता-यात बोलत होते. आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा निघाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत. हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल, असा मला विश्वास होता.
या लढ्याच्या यशाबद्दल मी जरांगे पाटील यांचे अभिनंदन करतो. मनोज जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य माणसांची ताकद दाखवून दिली आणि मराठा समाजानेही सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या मनोज जरांगे पाटील यांना ताकद दिली. या लढ्यातून सर्वसामान्य माणसाची ताकद दिसून आली, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे खरोखरच ज्यांना या आरक्षणाची गरज आहे त्यांना या आरक्षणाचा नक्की लाभ होईल, असेही शिवेद्रसिंहराजे यांनी सांगितले.
या आधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण उद्धव ठाकरे यांच्या काळात ते टिकले नाही. मात्र, या आधीच्या कोणत्याही मराठा मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय दिला नाही. मात्र आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी तो न्याय मिळवून दिला आहे.