बीड : प्रतिनिधी
गेल्या महिना-दीड महिन्यापासून बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर देशाच्या नकाशावर आला आहे. परळी पॅटर्न, पीक विमा, हार्वेस्टर घोटाळ्यांच्या मालिकेने बीडची जगभरात बदनामी सुरू आहे. त्यात आता बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील १३ सरपंच तर ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केल्याच्या आदेशाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गेल्या महिना-दीड महिन्यापासून बीड जिल्हा राज्याच्याच नाही तर जगाच्या नकाशावर आला आहे. जिल्ह्यातील विविध घोटाळे गाजत आहेत. त्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय गुंडगिरी चव्हाट्यावर आली.
परळी पॅटर्न, पीक विमा, हार्वेस्टर आदी घोटाळे होत आहेत. त्यातच बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जिल्ह्यातील १३ सरपंच तर ४१८ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिका-यांनी हे आदेश दिले आहेत. जिल्हाधिका-यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील ४१८ ग्रामपंचायत सदस्य आणि १३ सरपंचांचे सदस्यत्व रद्द केले आहे.
मुदत उलटूनही जात प्रमाणपत्र सादर नाही
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणा-या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र २०२० पासून पुढे झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या अनेक सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. परिणामी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आष्टी, अंबाजोगाई, वडवणी, पाटोदा, माजलगाव, केज आणि धारूर तालुक्यातील ४१८ ग्रामपंचायत सदस्य आणि १३ सरपंचांचे सदस्यत्व रद्द केले आहे.