लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यावर कारवाई करीत २ लाख २८ हजार ८५४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत. दि. २२ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास खात्रीशीर माहिती मिळाली की, गुळ मार्केट ते सम्राट चौककडे जाणा-या रोडवरील श्रीयश ट्रेडर्स नावाच्या दुकानात लपून-छपून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी साठवणूक केली आहे.
सदर माहितीची शहानिशा करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने बुधवारी श्रीयश ट्रेडर्स अँड जनरल नावाच्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या कंपनीचा २ लाख २८ हजार ८५४ रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा करण्यात जप्त केले आहे. प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसायासाठी साठवणूक करणा-या सागर गोविंदराव दरेकर वय २९, राहणार अहिल्यानगर लातूर याच्याविरोधात गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांच्या नेतृत्वातील पोलीस पथकातील पोलीस अमलदार रियाज सौदागर, मनोज खोसे, जमीर शेख, राहुल कांबळे, नितीन कठारे, चालक पोलिस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.