27.7 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्र‘सागर’ बनला विधानसभा निवडणुकीचे केंद्र

‘सागर’ बनला विधानसभा निवडणुकीचे केंद्र

देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी इच्छुकांची गर्दी

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपमध्ये व्यक्तीकेंद्रित राजकारण होत नव्हते. पक्षाची सूत्रं पक्षाच्या मुख्यालयातून चालत होती. परंतु आता भाजपमध्ये बदल होऊ लागला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची एकहाती सूत्रं भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभळणार आहेत. त्यामुळे भाजपची पहिली यादी जाहीर होताच देवेंद्र फडणवीस यांचा ‘सागर’ बंगला सत्तेच्या केंद्रस्थानी आला आहे. तिकिट इच्छुक, नाराज आणि तिकिट मिळालेले सर्वच लोक देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर पोहोचत आहेत.

पुण्यातील खडकवासला विधानसभा विद्यमान आमदार भीमराव तापकीर ‘सागर’वर दाखल झाले आहेत. भीमराव तापकीर यांचे पहिल्या यादीत नाव नाही. मावळचे आमदार सुनील शेळके विरोधातील भाजपचे बाळा भेगडेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले आहेत.

अंधेरीतील मुरजी पटेल बंगल्यावर
अंधेरी पूर्व येथून इच्छुक मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला ‘सागर’ बंगल्यावर आले आहेत. भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला होता. परंतु अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्याने त्यांनी माघार घेतली होती. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत या भागातून महायुतीला मताधिक्य मिळाले होते.

मुंबईतील भाजपच्या १४ जागा जाहीर
मुंबईतील भाजपच्या १४ जागा जाहीर झाल्या आहेत. मात्र वर्सोवा मतदारसंघ वेट अँड वॉचवर ठेवण्यात आलेला आहे. यामुळे वर्सोवा मतदारसंघातील आमदार भारती लव्हेकर फडणवीस यांच्या भेटीला आल्या आहेत. बोरिवलीचे सुनील राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहेत. पहिल्या यादीत सुनील राणेंचे नाव नाही. त्यामुळे ते फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. मुंबादेवीचे माजी आमदार अतुल शाह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहेत. मुंबादेवी येथून अतुल शाह इच्छुक आहेत. मुंबादेवी मतदारसंघावरून राष्ट्रवादी व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस आमदार अमिन पटेलांविरोधात शाह मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत.

मुलासाठी पाचपुतेंचा आग्रह
बबनराव पाचपुते हे त्यांची पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासोबत ‘सागर’ बंगल्यावर आले आहेत. प्रतिभा पाचपुते यांना भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर झाली. मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून दोघेही आग्रही आहेत.

सत्यजित तांबे दाखल होताच जोरदार चर्चा
आमदार सत्यजित तांबे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आले आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले सत्यजित तांबे हे नाशिक पदवीधरचे आमदार आहेत. सत्यजित तांबे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आल्यामुळे राजकीय चर्चा जोरात सुरू झाल्या आहेत.

फडणवीस यांच्या घरी गर्दी
श्रीगोंदा – बबनराव पाचपुते आणि प्रतिभा पाचपुते
वर्सोवा – भारती लव्हेकर
खडकवासला – भीमराव तापकीर
मावळ – इच्छुक बाळा भेगडे
बोरीवली – सुनील राणे
मुंबादेवी – इच्छुक अतुल शाह

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR