लातूर : प्रतिनिधी
गेल्यावर्षी १ रूपयात पिक विमा भरण्याची सोय यावर्षापासून बंद करण्यात आली आहे. या वर्षापासूनच्या खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बदल झाल्यामुळे शेतकरीही पिक विमा भरण्यासाठी फारसे उत्साही दिसत नाहीत. आज पर्यंत जिल्हयातील ५ लाख ६१ हजार २७७ शेतक-यांनी ३ लाख ५७ हजार हेक्टरवरील तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचा पिक विमा उतरवला आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना अधिसूचित पिकांसाठी विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी गुरूवार दि. ३१ जुलै ही अंतिम मुदत आहे.
लातूर जिल्हयात १८५.४ मिली मिटर पाऊस झाला आहे. या पावसाच्या आधारावरच जिल्हयात ५ लाख ६३ हजार ८५० हेक्टरवर शेतक-यांनी खरीपाच्या पेरण्या उरकल्या असून पडणा-या पावसाची अनिश्चितता पाहता पिकांना पिक विम्याचे संरक्षण असणे आवश्यक आहे. मात्र शासनाने शासनाने २०२५-२६ या वर्षापासून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत बदल केला आहे. पूर्वी १ रूपयात पिक विमा भरण्याची पध्दत या वर्षापासून बंद केली आहे. पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतक-यांना ई-पिक पाहणी आणि फार्मर आयडी अनिवार्य आहे. ही योजना लातूर जिल्ह्यातील अधिसूचित मंडळांमधील अधिसूचित पिकांसाठी लागू असून, कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक आहे. खरीप हंगामासाठी विमा हप्त्यामध्ये सोयाबीन पिकासाठी शेतक-यांना १ हजार १६० रुपये हप्ता भरावा लागत आहे.
तूर पिकासाठी ८२० रुपये हप्ता, मूग आणि उडीद पिकांसाठी ५०० रुपये हप्ता, खरीप ज्वारीसाठी ५८० रुपये हप्ता, कापसासाठी १ हजार ७१० रुपये हप्ता, तर बाजरीसाठी ५२० रुपये हप्ता आहे. लातूर जिल्हयातील ५ लाख ६१ हजार २७७ शेतक-यांनी ३ लाख ५७ हजार हेक्टरवरील तूर, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, कापूस आदी पिकांचा पिक विमा उतरवला आहे. पिक विमा भरण्यासाठी आज शेवटची तारीख आसून आज पर्यंत अहमदपूर ७७ हजार ६४१ शेतक-यांनी पिक विमा उतरवला आहे. तसेच औसा ७९ हजार ९६१, चाकूर ५३ हजार २४, देवणी ३५ हजार ७०८, जळकोट ३७ हजार ६१६, लातूर ४४ हजार ३४४, निलंगा १ लाख २ हजार ८९८, रेणापूर ३५ हजार ६०६, शिरूर अनंतपाळ २४ हजार १२८, उदगीर ७० हजार ३५१ शेतक-यांनी पिक विमा भरला आहे.