छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर दरोडा टाकणा-या टोळीचा मुख्य सूत्रधार अमोल खोतकर याचा पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एन्काऊंटर केला. आता त्याचा एक जुना व्हीडीओ व्हायरल झाला असून, त्यात अमोल पिस्तूल स्वच्छ करताना आणि गुन्हेगारी गर्वाने बोलताना दिसत आहे.
व्हीडीओत त्याचे साथीदार त्याला ‘मर्डर किंग’, ‘किंग ऑफ मर्डर’ म्हणून संबोधतात, तर बंदुका हातात घेऊन तो म्हणतो, ‘गोळ्यांची किंमत साधी नाही. एक सुपारी एक कोटी रुपये. समोरचा माणूस १०० टक्के संपतो, ही खात्री आहे.’ अशा वल्गना करत असल्याचे दिसते. हा व्हीडीओ अमोलच्या गुन्हेगारी वृत्तीचा स्पष्ट पुरावा मानला जात असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
१४ मेच्या मध्यरात्री वाळूज एमआयडीसी परिसरात संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर सहा दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला होता. ५.५ किलो सोनं, ३२ किलो चांदी आणि ७० हजार रुपये असा ऐवज त्यांनी लंपास केला होता. ही घटना पोलिस ठाण्यापासून केवळ १ किलोमीटर अंतरावर घडल्याने सुरुवातीला खळबळ उडाली होती. या दरोड्याचा कट रचणारा लड्डांचा बालमित्र बालासाहेब इंगोले असून, त्याने अमोल खोतकर, योगेश हाजबे व इतर सहका-यांसह दरोड्याचे नियोजन केल्याचे समोर आले. इंगोले व इतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली, मात्र अमोल फरार राहिला.
एन्काऊंटर आणि साक्षीदाराचा जबाब
२६ मेच्या मध्यरात्री पोलिसांनी वडगाव कोल्हाटी ते सांजापूर रोडवरील एका हॉटेलजवळ अमोल खोतकरचा शोध घेत सापळा रचला. पोलिसांना पाहताच अमोलने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांवर गोळी झाडली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जागीच ठार झाला. घटनास्थळी अमोलसोबत त्याची मैत्रीण खुशी ऊर्फ हाफिजा शेख हिची उपस्थिती होती. तिने दिलेल्या न्यायालयीन जबाबात अमोलनेच पोलिसांवर पहिली गोळी झाडली असल्याचे सांगितले. तिचा जबाब पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरतोय.