22.9 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्रसायबर गुन्हेगारांनी घातला ७ हजार कोटींना गंडा!

सायबर गुन्हेगारांनी घातला ७ हजार कोटींना गंडा!

फसवणुकीचे वर्षभरात ८ हजार ९७४ गुन्हे, राज्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ
मुंबई : प्रतिनिधी
मुंबई तसेच राज्यभरात सध्या सायबर गुन्ह्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या वर्षभरात राज्यात एकूण ८ हजार ९७४ फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्याअंतर्गत तब्बल ७ हजार ६३४ कोटी २५ लाख ४६ हजार ५०८ इतक्या रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत सर्वाधिक ४ हजार ८४९ गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी पुण्यात सर्वाधिक ६ हजार ७ कोटी ९३ लाख ४ हजार ३९८ रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरातून समोर आली.

विधानसभेत आमदार मोहन मते, ज्योती गायकवाड, विकास ठाकरे, अमिन पटेल, सुनील प्रभू यांच्यासह इतर अनेक पक्षातील आमदारांनी राज्यातील नागरिकांची विविध प्रकरणात झालेल्या सायबर फसवणुकीबाबत लेखी तारांकीत प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तरात वरील माहिती दिली. या आकडेवारीनुसार मुंबई, ठाणे, नागपूर आणि पुणे या शहरांमधील सायबर फसवणुकीबाबतची माहिती जाहीर केली.

या आकडेवारीनुसार मुंबई शहरात गेल्या वर्षभरात ४ हजार ८४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी ७५७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या ४ हजार ८४९ गुन्ह्यात एकूण ८८८ कोटी २९ लाख २३ हजार ९५ रुपयांची फसवणूक करण्यात आली होती तर ठाणे शहरात ६८० गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांना अटक करण्यात आली होती. यात एकूण १७४ कोटी ४ लाख ३६ हजार ६ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर शहरात एकूण २१२ गुन्हे दाखल करण्यात आले. या प्रकरणात ५ आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण ६३ कोटी ८५ लाख ९ हजार ५०१ रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे तर पुणे शहरात एकूण १५०४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ९ जणांना अटक करण्यात आली असून पुण्यातून ६ हजार ७ कोटी ९३ लाख ४ हजार ३९८ रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. हे वाढते प्रकार अत्यंत चिंतनीय आहेत. कारण अलिकडे ऑनलाईन आर्थिक व्यवहारात वाढ झाली आहे. त्यातच अकाऊंट हॅक करून किंवा वेगवेगळे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे.

असुरक्षेची भावना वाढली
काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरतानाच चार पैसे हाताशी ठेवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करतो. परंतु खात्यात जमा केलेल्या पैशांवर सायबर गुन्हेगार नजर ठेवून वेगवेगळ््या माध्यमातून लोकांची फसवणूक करीत खात्यावरील पैशांवर डल्ला मारत आहेत. राज्यात सायबर गुन्हेगारी वाढली असून, वाढती गुन्हेगारी आणि पैशांची लूट पाहता नागरिकांची चिंता वाढली असून, असुरक्षिततेची भावना वाढू लागली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR