अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ही अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे. दर्शन वैभव पळसकर (वय ९) या निष्पाप मुलाचा सावत्र वडील आकाश साहेबराव कान्हेरकर याने गौरव वसंतराव गायगोले या मित्राच्या मदतीने गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह अकोला व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील जंगलात फेकून दिला.
२ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता दर्शन हा कुणालाही न सांगता घराबाहेर पडल्याची माहिती त्याच्या आईने पोलिसांना दिली. अकोट शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल झाली. तपासाच्या सुरुवातीला पोलिसांना सावत्र वडिलांवर संशय गेला, कारण नुकत्याच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यात दर्शन आपल्या वडिलांसोबत जाताना दिसून आला होता. यातून तपासाची दिशा स्पष्ट होत गेली आणि चौकशीत आकाशने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या मित्रासोबत दर्शनला दुचाकीवर जंगलात नेले आणि गळा आवळून हत्या केली.
गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर अकोट पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम राबवली. ६० पोलिस कर्मचारी आणि ७ अधिका-यांनी १२ तास जंगल परिसरात शोध घेत मृतदेह शोधून काढला. सध्या मृतदेह अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.