औसा : प्रतिनिधी
साहित्य हे मानवी मनाला आनंद देणारे असले तरी साहित्याचा जन्म हा वेदनेच्या मुळातून होतो, वेदनेच्या मुळातून जन्मलेले साहित्य हे कसदार असते, असे प्रतिपादन श्री कुमारस्वामी महाविद्यालयात आयोजित ‘काव्यरंग’ कार्यक्रमात कवी नरसिंग इंगळे यांनी के ले. मंचावर प्राचार्य डॉ. संजय काळे, कवयीत्री श्रीमती भारती कांबळे, कवी लालासाहेब वाकसे, उपप्राचार्या डॉ. कुसूम ढोणे, प्रा. अशोक खानापूरे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सुधीर गरड, मराठी विभागप्रमुख डॉ. अनिल कांबळे यांची उपस्थिती होती.
रंगपंचमी व जागतिक महिलादिनाच्या औचित्याने आयोजित या ‘ काव्यरंग ‘ कार्यक्रमात कवी इंगळे यांनी विविध आशयाच्या कविता सादर केल्या. लेकीचा महिमा सांगताना ते म्हणाले, ‘लेक जिजा सावित्री, ती क्रांतीची ज्योत, ती गाथा ज्ञानेश्वरी, आमच्या जगण्याचा स्त्रोत ‘ लेक म्हणजे कस्तुरीचा गंध, लेक भाकरीची चव, लेक दिव्याचा प्रकाश अशा शब्दांत त्यांनी लेकीचा (मुलीचा) महिमा सांगितला. ‘खूप मोठे झालो आम्ही विसरलो आई ‘ या भावनेला साद घालणा-या कवितेने रसिकांच्या डोळयात पाणी आणले; तर ‘शाळा’ या कवितेतून प्राथमिक शाळेतील जुन्या उनाड बालपणाची आठवण करून दिली व ते दिवस संपल्याची खंतही व्यक्त केली.
कवयित्री कांबळे यांनी नारी शक्तीचा जागर करणारे ‘मैं शक्ती हूं ….’ हे गीत सादर केले तसेच ‘मीच मला आता सावरावं लागेल, क्वारंटाईन अशा कवितेतून स्त्रीयांचे सामाजिक वास्तव प्रकर्षाने मांडले. कवी वाकसे यांनी सुमधूर आवाजातील प्रेमकवितेतून प्रेमाच्या रिमझीम पावसात भिजण्याची अनुभूती काव्य रसिकांना दिली. विद्यार्थी निखील कांबळे याने आई पासून दूरदेशी राहण्यातील वेदना ‘दूर माझी आई ‘ या कवितेतून मांडली. या कार्यक्रमाच्या सुरूवातीला कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिला सन्मानविषयक शपथ घेण्यात आली.
यानिमित्ताने महाविद्यालयातील महिला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचा सन्मान करण्यात आला तर कवयीत्री भारती कांबळे यांनी आपले विविध कवितासंग्रह ग्रंथालयास भेट दिले. सदर काव्यरंग कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. सुधीर गरड यांनी केले तर आभार प्रा. अनिल कांबळे यांनी मानले. यावेळी ग्रंथपाल डॉ. अंबादास खिलारे, डॉ. जांबुवंतराव कदम, डॉ.संजीव अष्टूरे, डॉ. विनायक वाघमारे, डॉ. प्रसाद कदम, डॉ.दयानंद पटवारी, डॉ.प्रकाश कराड, डॉ.प्रमोद देशमुख, प्रा. ज्योती भोसले, डॉ. अनिता ढोले, डॉ. दिपा धावारे, प्रा. सविता कांबळे, सुनिता कल्याणी, दिपाली मानकरी यांच्यासह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

