इस्लामाबाद : वृत्तसंस्था
‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दारुण पराभव पत्करावा लागला तरी पाकिस्तान पुन्हा-पुन्हा भारताला युद्धाची धमकी देत आहे. आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणतात की, भारत आम्हाला सतत धमकावत आहे. पण जर पुन्हा युद्ध झाले, तर आम्ही भारताला धडा शिकवू. कधी ते म्हणतात की, गोळ्यांनी उत्तर देऊ, तर कधी पाणी रोखण्याची धमकी देतात. पण, सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर पाकिस्तानचा हक्क आहे, अशी मुक्ताफळे शरीफ यांनी उधळली.
शाहबाज शरीफ पुढे म्हणाले की, सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क आहे. आम्ही १९६० मध्ये सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. आता, भारत आम्हाला पाण्यासाठी दिवसरात्र धमकावतो.
अलीकडेच पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानला धमकी वजा इशारा दिला होता. ‘चुपचाप भाकरी खा, नाहीतर माझी गोळी तर आहेच’ असे मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदींच्या या विधानाची भीती स्पष्टपणे दिसून येते. शाहबाज शरीफपासून ते बिलावल भुट्टोपर्यंत सर्वजण मोदींच्या या विधानावर टीका करत आहेत. शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानमधील भाषणादरम्यान मोदींच्या या विधानाचा उल्लेख केला, तर
पाकिस्तानच्या एका शिष्टमंडळासह अमेरिकेत पोहोचलेले बिलावल भुट्टो यांनी भारताशी चर्चेची विनंती केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.