26.6 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeमुख्य बातम्यासिद्धरामय्यांना ईडीचा दणका; १०० कोटींची मालमत्ता जप्त

सिद्धरामय्यांना ईडीचा दणका; १०० कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कर्नाटकच्या राजकारणातून सर्वांत मोठी माहिती समोर आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची एकूण १०० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांच्या मुडा कथित घोटाळ्यात सिद्धरामय्या यांच्याशी सबंधीत एकूण ९२ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळुरू येथील विभागीय कार्यालयाने एकूण ९२ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या स्थावर मालमत्तांचे बाजारमूल्य अंदाजे १०० कोटी रुपये आहे. ईडीने ही कारवाई आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीएमएलए कायद्याअंतर्गत केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता या गृहनिर्माण सहकारी संस्था किंवा मुडा अधिका-यांसह इतर प्रभवशाली व्यक्तींच्या सोईसाठी बनावट असलेल्या व्यक्तींच्या नावावर आहेत.

म्हैसुरच्या लोकायुक्त पोलिसांनी आयपीसीच्या वेगवगळ्या कलमांतर्गत तसेच १९८८ सालाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सिद्धरामय्या तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याची दखल घेऊन ईडीने या कथित घोटाळ्याची चौकशी चालू केली होती. या चौकशीअंतर्गत आता १०० कोटींची ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

सिद्धरामय्या यांच्यावर त्यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीने ३ एकर १६ गुंठे जमीन अधिगृहित केली होती. याच जमिनीच्या बदल्यात सिद्धरामय्या यांनी त्यांची पत्नी बीएम पार्वती यांच्या नावे १४ आलिशान साईट्स नावावर करून घेतल्याचा आरोप आहे. मुडाने अधिगृहित केलेल्या जमिनींचे मूल्य हे ३ लाख २४ हजार ७०० रुपये आहे. पण मुडाने भरपाई म्हणून दिलेल्या आलिशान जागांचे मूल्य हे जवळपास ५६ कोटी रुपये आहे, असा दावा केला जात आहे. मुडाने केलेल्या याच कथित व्यवहारावर आक्षेप घेण्यात आला होता.

दरम्यान, ईडीच्या या कारवाईनंतर सिद्धरामय्या यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता ईडीच्या कारवाईवर ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ईडीच्या या कारवाईमुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR