22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरसुनेगाव (शेंद्री) येथील पुलावरुन पाणी

सुनेगाव (शेंद्री) येथील पुलावरुन पाणी

अहमदपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील सुनेगाव (शेंद्री) या गावाला जाणारा रस्ता व मन्याड नदीवर बांधलेला पूल गेल्या काही दिवसापासून सतत पडत असलेल्या अतिवृष्टीने मन्याड नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेला आहे. यामुळे वृध्द नागरीक, शाळकरी मुले, शेतकरी, व्यापारी तसेच ग्रामस्थांचा तालुक्याशी  संपर्क तुटला आहे.
तत्कालीन आमदारांनी सुनेगाव ( शेंद्री) या गावातील नागरीकांना, शाळकरी मुले, महीला व शेतक-यांना अहमदपूर तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने साधारणत: सन २००८ ला पुलाचे काम झाले आहे. तसेच पुलाची उंची उत्यंत कमी असल्यामुळे आणी पुल्याच्या दोन्ही बाजूनी रस्त्याचा आधार नसल्यामुळे सन २०१६ साली अतिवृष्टीमुळे पूल वाहून गेला. ग्रामस्थांनी सन २०१७ मध्ये  जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीवर पुलाचे काम व पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार टाकून तो  शंभर टक्के यशस्वी ही केला तद्नंतर प्रशासनाने गावक-यांच्या लोकवर्गणीतून पुलाच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता तयार केला परंतु प्रत्येक पावसाळ्यात नदीला पूर आला की पुलाच्या बाजुचा रस्ता वाहुन जात आहे.
या त्रासाला कंटाळून पुन्हा एकदा सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला तोही शंभर टक्के यशस्वी केला तेव्हा पासुन आज तागायत या पुलाची शासनाकडून दुरुस्ती झालेली नसून ग्रामस्थच प्रत्येक वर्षी वर्गणी गोळा करून दगड, गोटे, मुरूम टाकुन वाहतुकीचा प्रश्न सोडवत असल्याचे सांगितले. मन्याड नदीवरील पुल व रस्ता  पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे पुल व रस्ता वाहुन गेला आहे की नाही हे पुराचे पाणी कमी झाल्यासच कळणार आहे. या संदर्भात ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सर्वच राजकीय पक्षाच्या पुढा-यांंना, प्रशासनाला निवेदने दिली आहेत. लाक्षणिक उपोषण ही केले परंतु अद्यापही पक्का रस्ता आणि पुलाचे बांधकाम झाले नाही. तेव्हा तातडीने रस्ता व पुलाचे काम करावे अशी मागणी सरपंच उषा जायभाये तसेच सुनेगाव ( शेंद्री) चे ग्रामस्थांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR