मुंबई : प्रतिनिधी
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘लेकीने माहेरी लुडबूड करू नये’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. चाकणकरांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
महिला म्हणून चाकणकरांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून काम करणा-या एका व्यक्तीने केलेले वक्तव्य म्हणून चिंतनीय आहे, असे सुषमा अंधारे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
रुपाली चाकणकर यांनी केलेल्या या वक्तव्याबाबत अद्यापही सुप्रिया सुळे यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु, अंधारे यांनी त्यांच्या फेसबुकवर याबाबतची एक पोस्ट लिहिली आहे. रुपाली चाकणकर या अशा पद्धतीची वक्तव्ये का करत आहेत, हे जाणून घेण्यात कोणताही रस नाही. परंतु, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा पद्धतीचे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत मांडत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच, राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या पदाची गरिमा आणि राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वसा-वारसा कळत असेल तर आपण आपले शब्द परत घ्याल अशी अपेक्षा आहे, पण ती अपेक्षा अर्थात फोल ठरेल, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी चाकणकरांना सुनावले आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर या बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंचे नाव न घेता त्यांच्यावर खोचक टीका करत म्हणाल्या की, ‘लग्नानंतर मुलीने सासरी लुडबूड करायची नसते. तिचे एकदा लग्न लावून दिले की तिने सासरीच नांदायचे असते. माहेरी किती लुडबूड करावी यालाही मर्यादा असतात. परंतु, त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चाकणकरांनी केलेल्या विधानामुळे अंधारे संतापल्या असून त्यांनी यासाठी चाकणकरांना खडेबोल सुनावले आहेत.