लातूर : प्रतिनिधी
आपल्या परिवाराचा विचार करून आपण काम करत असतो. असाच विचार करून जर समाजासाठी काम केले तर ते समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरेल ही प्रेरणा या उपक्रमाच्या माध्यमातून घ्यावी. सेवाभावी संस्थांचे कार्य प्रेरणादायी असून समाजासाठी कार्य करणे महत्त्वाचे असल्याचे विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सांगितले.
मनशक्ती केंद्र, लोणावळा आणि भारत विकास परिषद, शाखा लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मनशक्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (५० वर्षे) ‘मनशक्ती यश शांतीसाठी’ या नव्या उपक्रमांतर्गत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन लातूर येथील दिवाणजी मंगल कार्यालयात करण्यात आले होते त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी मनशक्ती केंद्राचे प्रमोद शिंदे, मयूर चंदने, उमाताई चंदने, सुहासदादा, भाग्यश्री पाटील, संगीता मोळवने आणि मनशक्ती केंद्र लोणावळा येथील अनेक साधक उपस्थित होते.
माणूस प्रतिष्ठानच्या माध्यमातून शरद झरे आणि संगीता झरे तर राधाकृष्ण फाऊंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असलेले बालाजी सोळंके यांनी केलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक करत चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख म्हणाल्या की, अशा प्रकारचे नि:स्वार्थ कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने काहीतरी वेगळं काम करणे, दुस-याच्या उपयोगी पडणे अवश्यक असून अशा प्रकारचं कार्य या संस्था करत आहेत. त्यांचे कार्य निश्चितच अभिनंदनीय आहे.
या कार्यक्रमाच्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी माईंड जिम या प्रात्यक्षिक कार्यक्रमास विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी भेट दिली. या वेळी मेंदूचा विकास मनाची एकाग्रता सृजनशीलता वाढवणा-या अॅक्टिव्हिटीज आणि यंत्र चाचण्याचे डेमोची पाहणी केली तसेच या काही उपक्रमांमध्ये त्यांनी काही उपक्रमात स्वत: सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष घुधाटे यांनी केले तर आभार मयूर चंदने यांनी मानले.