जळकोट : ओमकार सोनटक्के
महाराष्ट्रात महायुती सरकारला अनेक योजना राबवून पुन्हा सत्तेत येण्याची घाई झाली आहे परंतु त्यांच्याकडून मूळ प्रश्नाला बगल देत अनेक ‘लाडक्या’ योजना सुरू करण्यात आल्या आहेत. लाडक्या बहीणींना दरमहा दिड हजार देण्यात येत आहेत परंतु हे पैसे दाजीच्या सोयाबीनमधून मारले जात आहेत. सोयाबीनला सरकारचा हमीभाव ४९०० रुपये प्रतिक्विंटल आहे परंतु सरकारी धोरणामुळे बाजारातील अनिश्चीततेची स्थिती पाहता ३९०० रुपये दरानेही सोयाबीन खरेदी करण्यासाठी व्यापारी धजावत नाहीत, असे चित्र दिसत आहे.
यंदा खरीप हंगामात वेळेवर पेरण्या पूर्ण झाल्याने आणि पावसानेही कमी अधिक प्रमाणात अपेक्षीत साथ दिल्याने यंदा सोयाबीन उत्पादन ब-यापैकी होण्याची शक्यता आहे परंतु सध्या कोसळलेले सोयाबीनचे दर पाहून सोयाबीन उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणार नसल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. हमीभावापेक्षा हजार ते बाराशे रुपये कमी दराने सध्या सोयाबीनची खरेदी सुरु आहे. दोन वर्षांपूर्वीचे सोयाबीनचे दर पाहिले आणि आजचे दर पाहिले तर सोयाबीनचा दर अर्ध्यावर येऊन पोहोला आहे. अनेक शेतक-यांनी सोयाबीनचा दर वाढेल या अशेपोटी वर्षभर सोयाबीन घरीच ठेवले होते परंतु भाव कमी होत आहेत.