सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ५ जण त्यांच्याच घरी बेशुद्धावस्थेत आढळल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी या कुटुंबातील ५ जणांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पण, त्यांच्यापैकी दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, दोन महिला गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत.
तसेच, एक पुरुष शुद्धीवर आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील मुख्य झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या लोधी गल्ली परिसरात राहणारे हे कुटुंब आहे.
गवंडी काम करणारे युवराज मोहन सिंह बलरामवाले पत्नी रंजना आई विमल आणि दोन मुलं हर्ष आणि अक्षरासोबत ते राहत आहेत. दोन दिवसांपूर्वी युवराज मोहन सिंह बलरामवाले आणि यांचे कुटुंबीय देव दर्शनासाठी एका ठिकाणी गेले होते. रविवारी (३१ ऑगस्ट) त्यांच्या घरी नातेवाईक आले होते. सर्वांना त्यांनी तिरुपतीचा प्रसाद वाटला. यांनतर ते झोपले. पण, रात्री झोपताना त्यांनी गॅस व्यवस्थित बंद केला नव्हता. रात्रभर गॅस गळती झाली आणि ५ जणांचा श्वास गुदमरल्यामुळे ते बेशुद्ध झाले.
१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बलरामवाले कुटुंबांनी दरवाजा न उघडल्याने त्यांच्या नातेवाईकांना स्थानिकांनी फोन करून सर्व प्रकार सांगितला. नातेवाईकांनी घराचा दरवाजा उघडला आणि त्यांना धक्काच बसला. आतमध्ये गॅसचा वास येत होता तर पाचही जणांच्या तोंडातून फेस येत होता. हे पाहताच पाचही जणांना तातडीने रुग्णालात दाखल करण्यात आले.
यावेळी उपचारादरम्यान लहान बहीण भावांचा मृत्यू झाला. तर, वडील, आई आणि आजी या तिघांवर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ६ वर्षीय हर्ष आणि 4 वर्षीय अक्षरा बलरामवाले या दोन चिमुकल्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. तर, ३५ वर्षीय रंजना युवराज बलरामवाले आणि ६० वर्षीय विमल मोहन सिंग बलरामवाले यांची प्रकृती गंभीर आहे. तसेच, ४० वर्षीय युवराज मोहन सिंग बलरामवाले हे शुद्धीत आले आहेत.