21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यात ज्वारीची केवळ १ लाख ७१ हजार ६९१ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी

सोलापूर जिल्ह्यात ज्वारीची केवळ १ लाख ७१ हजार ६९१ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी

सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. त्या अतिरिक्त पावसाचा फटका रब्बी हंगामाला बसला आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्यामुळे अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे रब्बीसाठीची मशागत करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील विविध पिकांच्या पेरणीवर झाला आहे.

जिल्ह्यातील ज्वारी पिकांच्या सरासरी एकूण ३ लाख १८ हजार ५७ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १ लाख ७१ हजार ६९१ हेक्टर क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. त्यामुळे यंदा गरिबांची भाकरी महागणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, जवस, तीळ, कांदा अशी पिके घेतली जातात. यंदा जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करता आली नाही, तर अनेक दिवस शेतातील सखल भागात पाणी साचलेले होते. त्यामुळे अपेक्षित क्षेत्रावर पेरणी होऊ शकली नाही.

त्यामुळे यंदा रब्बी हंगामात एकूण क्षेत्राच्या ५० टक्के क्षेत्रावरच विविध पिकाच्या पेरण्या करणे शक्य झाले आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील अनेक पिकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे कदाचित यंदा या पिकांचे भावही वाढण्याची शक्यता आहे. कारण उत्पन्न कमी आणि मागणी अधिक असेल तर भाव निश्चित वाढू शकतात. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील अनेक पिकांच्या उत्पादनात तूट आणि घट दिसून येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR