रायगड : प्रतिनिधी
कर्जत तालुक्यात दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्याच क्लिनरने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या पीडित मुली केवळ ५ वर्षाच्या आहेत. बदलापूर घटनेची पुरावृत्ती झालेल्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण पसरले आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे गेल्या १ वर्षापासून हा प्रकार मुलींसोबत घडत असल्याचं या मुलींकडून सांगण्यात आलं आहे.
करण दीपक पाटील असं या घटनेतील आरोपीचं नावं असून कर्जत तालुक्यातील वदप येथील तो रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपी क्लीनरला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील एका पिडीत मुलीला काल त्रास व्हायला लागल्यावर पालकांनी विश्वासात घेत विचारणा केल्यावर मुलींनी हा प्रकार सांगितला. आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा. त्यांना मांडीवर बसवून त्यांना स्पर्श करायचा. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या मुली सीटवर बसायला गेल्या नाही, तर आरोपी त्यांना मारहाण सुद्धा करायचा. हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत होता, अशी माहिती पालकांनी दिली आहे.