सर्वाधिक ४ वेळा कप जिंकण्याचा विक्रम
लंडन : वृत्तसंस्था
विम्बल्डननंतर युरो कपच्या फायनलमध्ये रविवारी रात्री उशिरा स्पेनच्या संघाने इंग्लंडचा २-१ ने पराभव करून युरो कपवर आपले नाव कोरले. विजेतेपदासह स्पेनने मोठा विक्रम केला. यावेळी त्यांनी चौथ्यांदा युरो कप जिंकला. त्यामुळे सर्वाधिक वेळा युरो कप जिंकणारा स्पेन पहिला देश बनला. या अगोदर स्पेन आणि जर्मनी दोन्ही संघ ३ विजेतेपदासह संयुक्त अव्वलस्थानी होते. मात्र, इंग्लंडने या स्पर्धेत नकोसा विक्रम केला.
इंग्लंडच्या संघाचा युरो कपच्या फायनलमध्ये पराभव झाला. इंग्लंडवर सलग दुस-यांदी ही नामुष्की ओढवली. मागच्या हंगामात इंग्लंडचा संघ इटलीकडून पराभूत झाला होता. नियोजित वेळेत सामना १-१ ने बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पेनल्टी शूट आऊटमध्ये इटलीने इंग्लंडचा ३-२ असा पराभव केला होता. यावर्षी स्पेनने इंग्लंडचा पराभव केला. त्यामुळे सलग दोन फायनलमध्ये पराभवाची नामुष्की ओढवलेला इंग्लंड पहिला देश ठरला. स्पेनच्या मिकेल आणि निको विल्यम्स यांनी अंतिम सामन्यात स्पेनकडून प्रत्येकी १-१ गोल केले. सामन्याचा पूर्वार्ध गोलशून्य बरोबरीत सुटला. पण सामन्याच्या उत्तरार्धात ३ गोल झाले. सुरुवातीला ४७ व्या मिनिटाला विल्यम्सने गोल गेला. त्यानंतर ७३ व्या मिनिटाला इंग्लंडकून कोल पाल्मरने गोल करीत बरोबरी केली. अखेर ८६ व्या मिनिटाला मिकेल ओयारजबलने स्पेनला पुन्हा २-१ ची आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली. त्यामुळे इंग्लंडचा पराभव झाला.