मुंबई : वृत्तसंस्था
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. ६२ चेंडूंत नाबाद ११२ धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर मंधाना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) शतक झळकावणारी व रोहित-विराटच्या यादीत स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या या दमदार खेळीमुळे भारताने इंग्लंडवर ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
कर्णधार हरमनप्रीत कौर सराव सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकली नाही. तिच्या अनुपस्थितीत स्मृतीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्मृतीने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत इंग्लिश गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. तिने आपल्या खेळीत १५ चौकार आणि तीन षटकार लगावले. या शतकासह मंधानाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तिने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १०६ धावांची खेळी केली होती. २०२१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच कसोटी सामन्यात १२७ धावा केल्या होत्या.
आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातही शतक झळकावून तिने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत शतक करण्याचा पराक्रम केला आहे. जागतिक महिला क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ती केवळ पाचवी फलंदाज आहे. यापूर्वी बेथ मूनी, लॉरा वोलवार्•, हीदर नाईट आणि टॅमी ब्यूमोंट यांनी हा विक्रम केला आहे.
या कामगिरीमुळे स्मृती मंधानाने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज भारतीय पुरुष क्रिकेटपटूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. पुरुष आणि महिला क्रिकेट मिळून आतापर्यंत केवळ सहा भारतीय फलंदाजांनी तिन्ही प्रकारांत शतके झळकावली आहेत. या यादीत सुरेश रैना, विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि शुभमन गिल यांच्यानंतर आता स्मृती मंधानाच्या नावाचाही समावेश झाला आहे.