ब्रिटनच्या राजघराण्याप्रमाणेच सौदी अरेबियाच्या राजघराण्याची कहाणी जगाला नेहमीच भुरळ घालते. प्राचीन इस्लामी परंपरा, प्रचंड संपत्ती आणि विलासी जीवनशैली यामुळे हे घराणं नेहमी चर्चेत असतं; परंतु या झगमगाटात एक अत्यंत दु:खद, असहाय्य, काळजाला भिडणारी आणि मानवी जीवनातील अनिश्चिततेचं भेदक दर्शन घडवणारी किनार आहे. ही किनार आहे, प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल यांची. आज जग त्यांना ‘स्लीपिंग प्रिन्स’ या नावाने ओळखतं. १८ एप्रिल २०२५ रोजी प्रिन्स अल-वलीद यांनी आपला ३६ वा वाढदिवस ‘साजरा’ केला; पण त्यांचं आयुष्य गेल्या २० वर्षांपासून चिरनिद्रेत आहे. २००५ मध्ये एक भयंकर रस्ता अपघात झाला आणि त्यानंतर ते कोमात गेले. त्या वेळी ते एका लष्करी प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होते. त्यांच्या मेंदूला गंभीर इजा झाली आणि तेव्हापासून ते कोमात आहेत.
प्रिन्स अल-वलीद हे सौदी अरेबियाचे संस्थापक राजा अब्दुल अझीझ यांचे पणतू आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव प्रिन्स खालिद बिन तलाल आणि आजोबा प्रिन्स तलाल बिन अब्दुल अझीझ. ते राजा अब्दुल अझीझ यांचे सुपुत्र होते त्यामुळे सध्याचे राजा सलमान बिन अब्दुल अझीझ हे प्रिन्स अल-वलीद यांचे पणजोबा आहेत. ते सत्तेच्या थेट उत्तराधिकारी शृंखलेत नसले तरीही ते शाही रक्तातूनच जन्मले आहेत. २० वर्षांपासून प्रिन्स अल-वलीद किंग अब्दुल अझीझ मेडिकल सिटी, रियाध येथे दाखल आहेत. त्यांचं संपूर्ण आयुष्य यंत्रांवर अवलंबून आहे. व्हेंटिलेटरद्वारे त्यांचा श्वास सुरू ठेवला जातो आणि फिडिंग ट्युबद्वारे त्यांना अन्न पुरवलं जातं. रोया न्यूजच्या रिपोर्टनुसार ते पूर्णपणे लाईफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. २०१९ मध्ये एक क्षण असा होता जेव्हा त्यांच्या शरीरात थोडी हालचाल दिसली. त्यांनी आपली बोट हलवलं आणि डोकं किंचित हालवलं. त्या वेळी कुटुंबीयांना वाटलं की, कदाचित हे त्यांच्या शुद्धीवर येण्याचे संकेत असावेत मात्र, डॉक्टरांनी या हालचाली मेंदूच्या अनैच्छिक प्रतिक्रिया होत्या, असे स्पष्ट केले.
एक वेळ डॉक्टरांनी त्यांच्या जीवन संकल्पनेवरच प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी लाइफ सपोर्ट काढून टाकण्याचा सल्ला दिला होत मात्र वडील प्रिन्स खालिद बिन तलाल यांनी तो सल्ला नाकारला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जर अल्लाहनं त्याला मृत्यूसाठी निवडलं असतं तर तो आजपर्यंत दफनही झाला असता; पण तो श्वास घेत असल्याने मी त्याच्या पुनरुत्थानासाठी लढणार. हे शब्द एका वडिलांच्या न संपणा-या आशेचं, श्रद्धेचं आणि प्रेमाचं प्रतीक मानले जातात. सौदी राजघराण्याच्या वैभवशाली गाथेत ही एक अशी गोष्ट आहे जी मानवी असहाय्यतेचा आणि अपरिमित आशेचा संगम दाखवते. सोन्याने झळाळणा-या भिंतींआड कुठल्याही हुकमी अधिकाराने या कोमात अडकलेल्या राजपुत्राला बाहेर आणता येत नाही.
स्लीपिंग प्रिन्स आज श्वास घेतो; पण जागा नाही, अस्तित्वात आहे; पण संवादात नाही. वर्षानुवर्षं त्यांची आई, वडील आणि सारे कुटुंब त्याच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत. सत्तेच्या शिखरावर असले तरी कोणतंही व्यक्तिमत्व मानवी दुखापासून मुक्त नाही. कोणतेही सामर्थ्य, कोणतेही पद, कोणतीही संपत्ती मानवी जीवनाच्या अनिश्चिततेवर मात करू शकत नाही, हेच ‘स्लिपिंग प्रिन्स’च्या कहाणीतून स्पष्ट होतं. वैभवाच्या कुशीत जन्म घेऊनही या राजपुत्राचे आयुष्य एका दुख:द वळणावर येऊन थांबले आहे तेही अनिश्चित काळासाठी! राजघराण्याची संपत्ती, पद, प्रतिष्ठा काहीही त्याला या असहाय्यतेतून बाहेर काढू शकत नाही. पैसा म्हणजे सर्वस्व ही धारणा असणा-यांसाठी ही कहाणी उद्बोधक आहे.
– जान्हवी शिरोडकर