नवी दिल्ली : वृत्तसंस्था
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता हे भारताच मुख्य लक्ष्य आहे. त्या दृष्टीनेच भारतात आता एका स्वदेशी लढाऊ विमानाची निर्मिती करण्यात येणार आहे. २०२८ पर्यंत स्वदेशी बनावटीचे पहिलं प्रोटोटाइप बनवण्याची योजना आहे. या विमानाचे जवळपास २७ टन वजन असेल. हे विमान जास्त वजनाची शस्त्रे घेऊन उड्डाण करण्यासाठी सक्षम असेल. भारताकडे सध्या सर्वात अत्याधुनिक म्हणजे राफेल फायटर विमान आहे.
पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट कमिटीने हिरवा झेंडा दाखवला आहे. या प्रकल्पासाठी १५ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. इंडियन एअर फोर्स आणि ऊफऊड मध्ये या संदर्भात नुकतीच बैठक झाली. तिथे ‘एएमसीए’ची डिजाईन, डेवलपमेंट आणि योजनेबद्दल सविस्तर चर्चा झाली.
हे लढाऊ विमान खास क्षमतांनी सुसज्ज असलेले फायटर जेट असेल. शत्रुला हे विमान ट्रॅक करता येऊ नये, यासाठी त्यामध्ये काही खास फिचर्स असतील. जनरल इलेक्ट्रिक ४१४ दोन इंजिन असतील. ‘एएमसीए’ विमान बनल्यानंतर भारताचा अमेरिका, रशिया आणि चीन या देशांच्या पंक्तीत समावेश होईल.
शेजारी देशांकडून असलेली आव्हान लक्षात घेता भारताला हे फायटर जेट लवकरात लवकर विकसित करायचे आहे. या प्रोजेक्टमध्ये सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील कंपन्या सुद्धा सहभागी होतील. ६५ हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्याच्या दृष्टीने हे विमान बनवण्यात येईल. इंडियन एअर फोर्स आणि भारतीय नौदलासाठी हे विमान विकसित करण्यात येईल. इंडियन एअरफोर्स या विमानाच्या ७ स्क्वॉड्रन बनवण्याचा विचार करत आहे.