23.1 C
Latur
Thursday, September 18, 2025
Homeसंपादकीयस्वस्थ नारी, सशक्त परिवार!

स्वस्थ नारी, सशक्त परिवार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून हे अभियान १५ दिवस चालणार आहे. देशभरात चालविल्या जाणा-या या अभियानात सरकारी रुग्णालये आणि आरोग्य सेवा केंद्रांच्या माध्यमातून १ लाख स्वास्थ्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. असंख्य सर्वसामान्य आणि गरीब नागरिकांना या अभियानाचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त १० लाख महिलांना ‘धनलाभ’ झाला आहे. १० लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये ‘मातृवंदना’ योजनेंतर्गत निधी हस्तांतरित करण्यात आला तसेच पंतप्रधान मोदींनी ‘सुमन सखी चॅटबॉट’ या अभिनव योजनेचाही शुभारंभ केला. या चॅटबॉटचा उपयोग प्रामुख्याने गर्भवती महिलांना होणार आहे.

तसेच ते ‘एक बगिया माँ के नाम’ या योजनेच्या अंतर्गत सहाय्यता गटांच्या महिलांना रोपटी प्रदान करणार आहेत. मध्य प्रदेशात दहा हजाराहून अधिक महिला या योजनेच्या अंतर्गत ‘माँ की बगिया’चा विकास त्यांच्या स्थानी करणार आहेत. हा वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प असून त्यामुळे वृक्षसंगोपन कार्याला मोठा हातभार लागणार आहे. ‘नवा भारत’ शत्रूच्या अण्वस्त्रांच्या धमकीला भीक न घालणारा सामर्थ्यवान देश आहे, आमच्या पराक्रमी सेनादलांनी पाकिस्तानला डोळ्याची पापणी लवते न लवते, इतक्या कमी वेळात गुडघ्यावर आणले. पाकची दहशतवादी यंत्रणा त्यांनी उद्ध्वस्त केली असून, दहशतवादाचे समर्थन करणा-या देशाला चांगलाच धडा शिकवला आहे अशी टीका पंतप्रधान मोदींनी आपल्या अमृतमहोत्सवी वाढदिनी मध्य प्रदेशातील धार येथे केली. मोदींनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी मध्य प्रदेशची निवड केली असून तेथे अनेक विकास प्रकरणांचे उद्घाटन केले. भारतीय जनता पक्षाने बुधवारपासून देशभरात ‘सेवा पंधरवडा’ हाती घेतला असून त्या अंतर्गत अनेक सेवाभावी कार्याचा शुभारंभ केला जाणार आहे.

बुधवारी देशासह सा-या जगातून पंतप्रधान मोदी यांच्यावर अभिनंदनाचा आणि अभिष्टचिंतनाचा वर्षाव करण्यात आला. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकमधील इस्लामी दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून नुकत्याच देण्यात आलेल्या कबुलीचा उल्लेख केला. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अभियानात या संघटनेचा म्होरक्या अझर मसूद याच्या कुटुंबातील अनेकांचा सफाया करण्यात आला. तशी कबुली या संघटनेचा हस्तक इलियास काश्मिरी याने नुकतीच दिली. भारताच्या वायुदलाने ६ व ७ मेच्या रात्री अचूक वायुहल्ला करून पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. बहावलपूर येथे मसूद याचे कुटुंबिय होते. हा तळ नष्ट झाल्यामुळे त्याच्या कुटुंबातील १० जण ठार झाले. केवळ दैव बलवत्तर म्हणून मसूद वाचला. या दहशतवादी संघटनेची यंत्रणा आणि मनोधैर्य भारताच्या अचूक आणि विनाशकारी कार्यवाहीमुळे पूर्णत: खचले आहे.

भारताच्या नागरिकांवर, अस्मितेवर आणि प्रतिष्ठेवर घाला घालण्याचे दु:साहस कोणी दाखवले, तर भारत त्याची काय अवस्था करतो. ते ‘सिंदूर’ अभियानातून पहावयास मिळाले आहे. हा नवा भारत आहे. त्याला कोणाच्याही अण्वस्त्रांच्या धमकीचे भय नाही. तो शत्रूच्या घरात घुसून त्याला लोळविणारा भारत आहे. त्याचे सामर्थ्य वादातीत आहे असा हल्लाबोल पंतप्रधानांनी केला. धार येथील सभेआधी त्यांनी मध्य प्रदेशातील अनेक विकास प्रकल्पांची उद्घाटने केली आणि शिलान्यासही केले. काही नव्या योजनांच्या घोषणाही केल्या. धार जिल्ह्यात त्यांच्या हस्ते ‘मित्र पार्क’ या वस्त्रप्रावरण निर्मिती संकुलाचा शिलान्यास करण्यात आला. हे औद्योगिक उद्यान २१५० एकर भूमीत विस्तारले जाणार असून त्यात २१ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. किमान ३ लाख रोजगार या प्रकल्पातून निर्माण होणार आहेत. मध्य प्रदेशातील हे सर्वांत मोठे वस्त्रप्रावरण निर्मिती स्थान आहे. पंतप्रधान मोदींनी नेहमीच आपला वाढदिवस विविध प्रकल्पांची उद्घाटने, कल्याणकारी योजनांचा शुभारंभ आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून साजरा केला आहे. महात्मा गांधींनी ‘स्वदेशी’चा वापर स्वातंत्र्याचे शस्त्र म्हणून केला.

आजच्या काळात ‘स्वदेशी’ हे विकसित भारताचे पायाभूत तत्त्व व्हायला हवे. त्यामुळे घरगुती वापराच्या छोट्या वस्तू, मुलांची खेळणी, गृहसजावटीच्या वस्तू किंवा मोबाईल, टीव्ही, फ्रिजसारख्या मोठ्या खरेदीपर्यंत सर्व वस्तू ‘स्वदेशी’च वापराव्यात, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना केले. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेबाबत मोदी म्हणाले की, कोणत्याही महिलेला अज्ञानामुळे किंवा संसाधनांच्या अभावामुळे त्रास होऊ नये. उच्च धोका असलेल्या आजारांचे उशिरा निदान झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यावर ही मोहीम प्रभावी ठरेल. ही मोहीम १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राबविली जाईल. या मोहिमेत रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग आणि कर्करोग आदी आजारांची तपासणी केली जाईल. या सर्व तपासण्या आणि औषधे मोफत दिली जातील. त्याचा खर्च सरकार उचलेल असे पंतप्रधान म्हणाले. आदिवासी भागातील ‘सिकल सेल अ‍ॅनिमिया’च्या आव्हानावर भाष्य करताना मोदी म्हणाले, २०२३ मध्ये या आजाराविरोधात राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात आली होती. मध्य प्रदेशातील शहडोल येथून ती सुरू झाली होती.

तिथे पहिले ‘सिकलसेल स्क्रिनिंग कार्ड’ देण्यात आले होते. आज या कार्यक्रमात एक कोटीचे कार्ड एका मुलीला देण्यात आले. स्वदेशीमुळे पैसा देशात राहतो. भांडवलाची गळती थांबते आणि थेट राष्ट्रीय विकासाला हातभार लागतो. याच पैशातून रस्ते, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली जातात आणि कल्याणकारी योजना गरिबांपर्यंत पोहोचतात. सणासुदीच्या काळात स्वदेशीचा मंत्र पुन्हा दृढ करण्याची गरज आहे. ज्या वस्तू विकत घ्याल किंवा विकाल त्या भारतात तयार झालेल्या असाव्यात. २२ सप्टेंबरपासून कमी केलेल्या जीएसटी दरांचा लाभ घ्या आणि स्वदेशी वस्तू खरेदी करा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. ‘मेड इन इंडिया’ वस्तंूची दुकाने उभारून ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ असे बोर्ड लावावेत अशी सूचनाही मोदी यांनी केली. जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR