जेरुसलेम : वृत्तसंस्था
गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि हमासमध्ये युद्ध चालू आहे. या युद्धात ४० हजारांहून अधिकांचे प्राण गेले तर लाखो लोक स्थलांतरित झाले. दरम्यान, आता हमासचा म्होरक्या याह्या सिनवार इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इस्रायलची लष्करी सेना आयडीएफने दिली. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनीही याबाबत दुजोरा दिला.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायल क्षेपणास्त्र डागून हल्ला केला होता. याह्या सिनवार हा या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. गेल्या काही दिवसांपासून इस्रायलने हमासविरोधातील हल्ले वाढवले होते. सातत्याने हवाई हल्ले केले जात आहेत. आज गुरुवारीही दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरात इस्रायलने हल्ला केला. या हल्ल्यात ३ दहशतावाद्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यापैकी एक याह्या सिनवार होता.
इस्रायलने हवाई हल्ला केल्यानंतर तीन दहशतवादी ठार केल्याची माहिती सुरुवातीला दिली होती. परंतु यात याह्या सिनवार मारला गेला की नाही, याबाबत कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नव्हती. सुरुवातीला इस्रायलच्या लष्कराने म्हटले होते की, आम्ही हमासच्या तीन दहशतावाद्यांना लक्ष्य केले होते. त्यापैकी एक हमासचा म्होरक्या याह्या सिनवार असू शकतो. सध्या कुठले दहशतवादी मारले गेले, त्यासंदर्भातील ओळख पटलेली नाही. मात्र शक्यता आहे की हमासचा म्होरक्या याह्या सिनावरचा यामध्ये मृत्यू झाला.