जालना : प्रतिनिधी
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना आणण्यासाठी चाललेल्या वाहनांवर गुरुवारी रात्री मातोरीमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली होती. या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान झाले तसेच काही जण जखमी झाल्याची देखील घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
यानंतर पोलिसांनी तातडीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मातोरीमध्ये झालेल्या दगडफेकीवर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मातोरी येथील दगडफेक प्रकरणात छगन भुजबळ यांचाच हात असावा, त्यांनीच त्यांच्या लोकांना दगडफेक करायला सांगितली असावी. भुजबळ यांना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भुजबळांवर बारीक लक्ष ठेवावे असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मातोरीत कुणालाही त्रास होता कामा नये, अन्यथा राज्यातील सगळे मराठे तिथे जातील. मराठ्यांनी आणि ओबीसींनी शांत राहावे. सगेसोयरेची व्याख्या पूर्ण झाल्याशिवाय आम्हाला मराठा आरक्षणाची अंमलबजावणी मान्य नाही. राज्यातील आमच्या दौ-याची तयारी पूर्ण झाली आहे. सगळ्या मराठा बांधवांनी जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र यावे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी वडीगोद्रीमधील आंदोलनानंतर आभार दौ-याचे आयोजन केले आहे. या दौ-यादरम्यान त्यांना घेण्यासाठी निघालेल्या वाहनांच्या ताफ्यावर बीड जिल्ह्यातल्या मातोरीमध्ये दगडफेक करण्यात आली. गुरुवारी रात्री लक्ष्मण हाके यांच्या रॅलीपूर्वी मातोरी गावात दगडफेक झाली. लक्ष्मण हाके भगवान गडावर दर्शनाला जाणार होते. त्याआधी डीजेवरून हा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.