मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत मंत्री नितेश राणे आक्रमक आहेत. पण आता महायुतीमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी या कायद्याबाबत वेगळी भूमिका घेतली आहे.
हिंदू-मुस्लिम मुला-मुलीचे लग्न झाले की, त्याला लव्ह जिहाद म्हणणे चुकीचे आहे. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायद्यात तरतूद असावी, अशी स्पष्ट भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.
रामदास आठवले म्हणाले, लव्ह जिहाद कायद्याला माझा विरोध आहे. हिंदू-मुस्लिम, दलित-सवर्ण मुलं-मुलीसुद्धा एकत्र येतात. लग्न होतात. हिंदू-मुस्लिम लग्न झाले की, त्याला लव्ह जिहाद म्हणणे चुकीचे आहे. मी याला सहमत नाही. परंतु धर्मांतर होऊ नये म्हणून कायदा असावा. तशी तरतूद असावी .
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना समान धरतात. हिंदू-मुस्लिम असं करत नाहीत. सर्व योजनांचा लाभ सर्वांना देतात. ते मुस्लिमांच्या विरोधात नाहीत. मुलाने हिंदू धर्म स्वीकारावा अशी तरतूद असावी. मुले-मुली एकत्र आले अन् सहमतीने लग्न झाले, तर त्यात वावगे काय? असा प्रश्न देखील रामदास आठवले यांनी उपस्थित केला.
शिर्डीतील गुन्हेगारीविषयी चिंता
रामदास आठवले यांनी शिर्डीतील गु्न्हेगारीविषयी चिंता व्यक्त केली. लुटीच्या उद्देशाने दोन निरपराध लोकांची हत्या झाली आहे. पोलिसांनी हा मुद्दा गांभीर्याने घेऊन, शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे, यासाठी पोलिसांना आपले देखील सहकार्य असेल, असेही ते म्हणाले.
कर्मचा-यांना मुख्यमंत्री निधीतून मदत
शिर्डीतील साई संस्थानच्या दोन निरपराध लोकांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी नातेवाईकांची मागणी आहे. मयतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळावी, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.