लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मिनी सरस व जिल्हास्तरीय ‘हिरकणी हाट-२०२५’ प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी या काळात आयोजन करण्यात आले आहे. लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे होणा-या या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी दिली.
महिला बचतगटांना त्यांनी तयार केलेली उत्पादने विक्री करणे, तसेच शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी या उपक्रमामुळे मिळणार आहे, तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होणार आहे. या प्रदर्शनात मिक्स मिलेट्स, मिलेट्सची बिस्किटे-चकल्या व नमकीन, कडधान्य, सर्व प्रकारचे मसाले, शेंगदाणा लाडू, मध, ज्वारी, बाजरी, सोया प्रोडक्ट्स, ढोकळा पीठ, हळद पावडर, विविध चटणी, खाद्य तेल, शुद्ध देशी गायीचे व म्हशीचे तूप, गायीच्या शेणापासून बनविलेल्या धुपबत्ती, मकर संक्रांतनिमित्तहलव्याचे दागिने, बांबूपासून विविध आकर्षक वस्तू, कोल्हापुरी चप्पल आदी वस्तूंचा समावेश असणार आहे.
भजी-भाकरी, पिठल-भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी, दही धपाटे, तीळ-गुळाची पोळी, निलंगा राईस, बोरसुरी वरण व चाट आदी पदार्थांची चव याठिकाणी चाखायला मिळेल. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उजनी स्पेशल खेकडा, मच्छी थाळी, चिकन, खानदेशी मांडे, मटन, ज्वारी व बाजरी भाकरी या ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे. तरी नागरिकांनी प्रदर्शनास भेट देवून उत्पादने खरेदी करावी. ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर यांनी केले आहे. यावेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, जिल्हा व्यवस्थापक-विपणन वैभव गुराळे उपस्थित होते.
मिनी सरस व हिरकणी हाट मध्ये लातूर जिल्ह्यातून ६५ व राज्यातील इतर जिल्ह्यातून १० स्टॉल असे एकूण ७५ स्टॉल लावण्यात येतील. याठिकाणी अभ्यागतांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळेल. ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती व नावीन्यपूर्ण उपक्रम साजरे करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.