अहिल्यानगर : प्रतिनिधी
‘ऑपरेशन सिंदूर’वर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय लष्कराचे कौतुक केले आहे. भारत स्वत:हून कोणाचीही छेड काढणार नाही आणि कोणी काढलीच तर सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीदेखील ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया दिली आहे. भारत स्वत:हून कोणाची छेड काढत नाही, मात्र कोणी केलं तर सोडायचं नाही. ही कारवाई योग्य आहे, असे अण्णांनी म्हटले आहे. पहलगाम हल्ल्याच्या १४ दिवसांनंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. मध्यरात्री १.०५ ते १. ३० वाजताच्या दरम्यान झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आले.
भारतीय लष्कराने केलेल्या कामाचे कौतुक शब्दांत करता येणार नाही. इतके सुंदर काम लष्कराने केले आहे. भारत स्वत:हून कोणाची छेड काढणार नाही. मात्र दुस-याने छेड काढली तर सोडायचं नाही. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ची ही कारवाई योग्यच आहे. काही कारण नसताना आपले २६ लोक मारले गेले. त्याचाच सूड भारताने घेतला आहे. त्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही. अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाचीही हिंमत होणार नाही, अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे.